पाडळसे येथील लाचखोर महिला सहायक अभियंत्यांसह दोन लाईनमन एसीबीच्या जाळ्यात
यावल ः तालुक्यातील पाडळसे येथे जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट झाला असल्याचे भासवून सकारात्मक अहवाल देण्यासाठी २० हजारांची लाच मागत चार हजारात तडजोड करीत लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह दोन लाचखोर लाईनमन व वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगाव एसीबीने अटक केली ही कारवाई गुरूवारी करण्यात आली असुन वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाडळसे ता.यावल येथील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे (४२, हुडको कॉलनी भुसावळ) तसेच लाईनमन संतोष सुकदेव इंगळे (४५, मल्हार कॉलनी, फैजपूर) व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी (३९, अयोध्या नगर, भुसावळ) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. तीन्ही लाचखोर सावदा विभागातील पाडळसा कक्ष कार्यालयात कार्यरत आहेत.
असे आहे लाच प्रकरण
भुसावळ तालुक्यातील ३४ तक्रारदार हे हॉटेल व्यावसायक आहेत. त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे, असे भासवून तक्रारदार यांच्यावतीने सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात तीन्ही आरोपींनी सुरूवातीला २० हजार व नंतर १५ हजार रुपये लाच बुधवार, १८ रोजी मागितली होती व चार हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी संतोष इंगळेने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर दोघा आरोपींनाही अटक करण्यात येवून त्यांच्याविरोधात फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.






