Mollywood: “मुंजा” ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड.. ह्या चित्रपटापासून मिळाली प्रेरणा..
मुंजा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय हा चित्रपट केवळ कथानकामुळेच पसंत केला जात आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेला मुंजा हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी कथानकाचे आणि त्यातील कलाकारांचे मोठे कौतुक केले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ४ कोटी २१ लाखांची कमाई केली. तर काल शनिवारी चित्रपटाला भरगोस प्रतिसाद मिळाला असून या एका दिवसात ७ कोटी ४० लाखांची कमाई करत यशाचा टप्पा गाठलेला पाहायला मिळाला. दरम्यान दोनच दिवसात मुंजा चित्रपटाने तब्बल ११ कोटी ६१ लाखांची कमाई केली आहे. तर आज रविवारी देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. मुंजा चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटात बरेचसे मराठी कलाकार झळकले आहेत.त्यामुळे हा चित्रपट मराठी कलाकारांचा चित्रपट म्हणून ओळख मिरवत आहे. शर्वरी वाघ, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, रसिका वेंगुर्लेकर, अनय कामत, अजय पूरकर, बालकलाकार खुशी हजारे या मराठी कलाकारांसह मुंजाची मुख्य भूमिका बालकलाकार आयुष उलगडे याने निभावली आहे. मुंजा म्हणजेच गोट्याच्या भूमिकेसाठी आयुषची सुरुवातीला लुकटेस्ट घेण्यात आली तेव्हा त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात झाली. आयुषने ही भूमिका अतिशय उत्तम निभावली असल्याचे दिसून येते. गोट्या हा मुलगा वयाने मोठ्या असलेल्या मुन्नीसोबत एकतर्फी प्रेम करत असतो. त्याचं हे वागणं त्याच्या घरच्यांना पटत नसतं. पण अघोरी कृत्य करून गोट्या काळी जादू करतो आणि यातच त्याला जीव गमवावा लागतो. पण तब्बल ७० वर्षाने तो पुन्हा एका वेगळ्या रुपात येऊन मुन्नीला शोधायला येतो. त्याचा हा शोध कसा पूर्ण होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.आयुषच्या या अभिनयाला तोड नाही असेच पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा हा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांनी मालिकेत देखील अनुभवला आहे. राजा राणीची गं जोडी, इंद्रायणी, ढ लेकाचा, संत गजानन शेगावीचे, दख्खनचा राजा ज्योतिबा, अधाशी अशा अनेक कलाकृतीतून तो महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. कोल्हापूरच्या शिंदे थिएटर अकॅडमीमधून आयुषने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. आयुषने मराठी मालिकासृष्टीत चांगला जम बसवला असून मुंजा चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्येही ओळख मिळाली आहे. मुंजाच्या भूमिकेसाठी त्याच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून मोठं कौतुक होत आहे. त्यामुळे सध्या तो मोठ्या पडद्यावरचा स्टार बनला आहे.
हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय हा चित्रपट केवळ कथानकामुळेच पसंत केला जात आहे. दिग्दर्शकाला हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा ‘कांतारा’ मधून मिळाली. या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
आदित्य सरपोतदारने नुकतेच एका मुलाखतीत मुंज्या चित्रपट बनवण्याची प्रेरणा कांतारा सिनेमातून मिळाल्याचे सांगितले. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे, ज्यांच्या कथा कोकणात, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. अशा कथांवर चित्रपट का बनत नाहीत, असा प्रश्न मला लहानपणापासून असायचा. अशा लोककथेवर आधारित ‘कांतारा’ हा चित्रपट खूप गाजला. आपल्या महाराष्ट्रात आणि देशातील प्रत्येक प्रांतात अशा अनेक कथा आहेत. त्यांच्यावर चित्रपट बनवले तर विषयांची कमतरता भासणार नाही.


