स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये ऑनलाईन वेबिनार संपन्न
रफिक आतार
पंढरपूर-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागाकडून अमेरिकेतील सॉफ्टवेअर तज्ञ हॅक मिलर यांचे ‘जिओ हेकर्स’ या सॉफ्टवेअर प्रणाली वर ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले. सध्याच्या बदलत्या युगामध्ये सॉफ्टवेअर प्रणालीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, त्याचाच एक भाग म्हणून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हॅक मिलर यांनी ‘जिओहेकर्स’ या सॉफ्टवेअरचा वापर पूर परिस्थिती व त्याचे नियोजन तसेच धरणामधून पाणी सोडताना उदभवणारे प्रश्न व त्याचे परिणाम कसे दूर करता येऊ शकतात या विषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर छोटे-मोठे पूल, नदी व ओढ्यावर कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने बांधता येतील जेणे करून त्यांची कार्यक्षमता वाढून जास्त वेळ टिकू शकतील यावरही मार्गदर्शन केले. या वेबिनार दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले व त्यांनी योग्य पद्धतीने निरसन ही केले. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत अत्यंत अनुभवी आणि मान्यवर तज्ञांकडून मौल्यवान मार्गदर्शन झाल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेबिनार मध्ये १७५ जणांनी सहभागी घेतला होता. सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी देखील या वेबिनारच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले.






