*पंढरीत जागवला माणुसकीचा शेजारधर्म*
पंढरपूर (प्रतिनिधी) -रफिक आतार
माणुसकीचा शेजारधर्म या संकल्पनेतून पंढरपूर येथील देवकाते मळा भागातील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, मोलमजुरी करणाऱ्या गरीब ४० कुटुंबांना पंधरा दिवस पुरेसे अन्नधान्य, रेशन आदी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक युवक जिल्हा कार्याध्यक्ष साजिद नजीर बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाटप केले. लाॅकडाऊन संपेपर्यंत पुन्हा आवश्यकतेनुसार सदर रेशन वाटण्यात येणार आहे.
कोरोना या साथीच्या आजारामुळे प्रशासनाने लॉकडाऊन पुन्हा वाढवल्याने गोरगरीब व मजुरी करणाऱ्या कुटूंबाचे हाल होत आहेत. समाजसेवी संस्थाकडून अनेक ठिकाणी मदतीचे हात पुढे आले असले तरी शहरालगतच्या वाड्या-वस्त्यांवर ही मदत पोहोचत नाही. तसेच शहरात जाऊन मदत मिळवणे शक्य होत नसल्याने अशा कुटुंबाची होत असलेली अडचण लक्षात घेऊन देवकते मळा येथील सादिक बागवान, सागर नागटिळक, गणेश जाधव वाजीद बागवान व सहकाऱ्यांनी परिसरात फिरून रोख रक्कम जमा केली व त्या रकमेतून आवश्यक असणारे गहू, साखर, तांदूळ, तेल व इतर किराणा वस्तू खरेदी करून महादेव मळा व देवकाते मळा या भागातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या मजूर कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य वाटप केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंचा वापर करण्यात आला.
तसेच या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला एक गट स्थापन करून या भागातील नागरिकांना पुढील काळात कोणतीही मदत लागल्यास ती पुरवण्याचे आश्वासन दिले. यामुळे या मजुरांच्या शेजाऱ्यांनी पाळलेल्या माणुसकीचा शेजारधर्म या संकल्पनेचे कौतुक होत आहे.






