लेखी आश्वासनानंतर आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे; चोपड्याला जागा वाढवून देणार; माजी आमदार जगदीश वळवी यांची मध्यस्थी..…
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आपल्या विविध १२ मागण्यांपैकी वसतिगृह प्रवेशाची मागणीसंदर्भात जादा प्रवेशाचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यातर्फे मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले. याकामी माजी आमदार जगदीश वळवी यांनी केलेली मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरली.
दि. 11 रोजी दुपारी १२ वाजेपासून हे विद्यार्थी चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात आपल्या १२ मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहापासून हे विद्यार्थी मोर्चाने उपोषणस्थळी आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कुणीही अधिकारी उपोषणकर्त्यांच्या भेटीला न आल्याने विद्यार्थ्याचा संताप अनावर झाला. अखेर माजी आमदार जगदीश वळवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी उपोषण स्थळी उपस्थित झाले.
माजी आमदार जगदीश वळवी यांनी प्रारंभी उपोषांकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर माजी आमदार जगदीश वळवी यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून कानउघाडणी केली.
लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित
प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्याना जागा वाढवून प्रवेश दिला जाईल या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाभरातील वसतिगृहातील विद्यार्थी संख्येचा आढावा घेतल्यानंतर तेथील जागा चोपडा वस्तीगृहाला वर्ग करण्यात येतील असे लेखी आश्वासन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. डी. चौधरी यांनी दिल्या नंतर उपोषण स्थगित करण्यात आले. तालुक्यातील ६५ मुले, ६० मुली वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत.
माजी आमदार जगदीश वळवी, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जीवन पवार, रमेश ठाकूर, रज्जाक तडवी, राजू तडवी यांनी प्रशासन व उपोषणार्थी यांच्यातील चर्चेमध्ये सहभाग घेतला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. डी. चौधरी, शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह (जुने) गृहपाल संजय कोळी, गृहपाल एन. एस. खंबायत हे उपस्थित होते.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (नवी दिल्ली) चे जळगाव जिल्हाध्यक्ष अड. दारासिंग पावरा, उपाध्यक्ष सागर पावरा, गोपाळ सोनवणे, निलेश भालेराव, सचिव संजय पाडवी, युवा सचिव राजेश बारेला, चोपडा तालुकाध्यक्ष मिथुन पावरा, युवा तालुकाध्यक्ष विनेश पावरा, उपाध्यक्ष सचिन पावरा, कालुसिंग पावरा, रेहांजल बारेला, आदेश पावरा, महेंद्र पावरा, शरद पावरा, मुन्नी पावरा, सविता पावरा, संगीता पावरा, सुनिता पावरा यांच्यासह सुमारे १४० मुले मुली उपोषणस्थळी उपस्थित होत्या.








