? Big Breaking..लक्ष्मी टाकळीच्या खंडणीबहाद्दर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाला रंगेहात अटक
पंढरपूर : जातिवाचक केस करण्याची धमकी देऊन एका चालकाकडून दहा हजार रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या तालुक्यातील एका तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह तोतया पत्रकारालाही पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खंडणी प्रकरणी लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी लक्ष्मण कांबळे, पांडुरंग अहिलाजी शेळके, ज्योतीराम भानुदास कांबळे (रा. भटुंबरे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चंद्रकांत सदाशिव आवटे (रा. लक्ष्मी टाकळी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, की संशयित आरोपी एप्रिल 2018 पासून फिर्यादी चंद्रकांत आवटे यांना खंडणी मागून ब्लॅकमेल करत होते.
कधी जेवण तर कधी पैसे मागून त्रास देत होते. “तुझ्यावर खोटे जातिवाचवक केसेस करतो. तात्पुरते 10 हजार रुपये दे’ असे म्हणून नेहमी मानसिक त्रास देत होते. त्यानंतर फिर्यादीने येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी सुरू असतानाच शुक्रवारी (ता. 18) पुन्हा आरोपी कांबळे व त्याच्या साथीदाराने फिर्यादीस धमकी देऊन खंडणीची रक्कम मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये बसलेल्या ठिकाणी छापा टाकला असता दहा हजारांपैकी सात हजार रुपयांची रोख खंडणी घेताना रंगेहाथ पकडले.
आरोपींवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात 384, 385, 388, 389 व 34 या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मगदुम हे करीत आहेत.






