? जळगांव LIVE … बाजारात चोरून लपून दुकाने सुरू, लॉकडाउनचा नावापुरताच देखावा
जळगांव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विशेष निर्बंध लादून सध्या लॉकडाउन सुरू आहे. मात्र, शहरातील गर्दी पाहता लॉकडाउन हा केवळ फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. बंद असलेले कापड, इलेक्ट्रिकल्स, जनरल स्टोअर्स आदींसह अन्य दुकाने देखील चोरुन लपून सुरू आहेत. रस्त्यावर देखील बऱ्यापैकी वर्दळ असल्याने लॉकडाउन केवळ नावाला उरले आहे.
राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यभरात लॉकडाउन केले आहे. शहरात मात्र लॉकडाउन नावालाच आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद आहेत. प्रत्यक्षात बंद असलेल्या दुकानांतून चोरुन लपून व्यवहार होत आहे. कापड, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिमेड, जनरल स्टोअर्स, फूटवेअर, मोबाइलच्या दुकानांचे शटर बाहेरून बंद, मात्र आतून व्यवहार सुरु आहेत. कुणीही नियमांचे पालन करत नाही. अनेक तरूण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. शहरातील विविध भागासह मुख्य मार्ग व चौकात भाजीपाला, फळ विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी कायम आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. शहरातील बँका, एटीएम या नेहमी गर्दी होणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझेशन होत नाही. दरम्यान, शहरात विनाकारण भटकंती करणाऱ्यांची रॅपिड अॅन्टिजेन चाचणी केली जाते. याच प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागात चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच दुकानदार, विक्रेत्यांकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आहे किंवा नाही? याची तपासणी गरजेची आहे. यामुळे कारवाईच्या धाकापोटी तरी नियम पाळले जातील, अशी शक्यता आहे.






