कुरूप…
प्रा जयश्री दाभाडे
रंग तिचा सावळा म्हणण्यापेक्षा काळाच….उंची नाही,सुंदर चाफेकळी नाक नाही…केस दाट नाहीत…सर्वच बाबतीत ती कमी ….लोकांच्या दृष्टीने कुरूप असलेली….लहानपणापासून च तिच्या दिसण्यावर ताशेरे ओढणारे अनेक…शेजारी पाजारी ,नातेवाईक,आप्त स्वकीय सर्वच तिच्या दिसण्यावर टीका करणारे…घालून पाडून बोलणारे…प्रत्येक पावलावर होणारी हेटाळणी तिला अस्वस्थ करत असे..प्रत्येक मिनिटाला होणारा अपमान हृदयाला शेकडो डागण्या देत असे…रस्त्यावर, शाळेत तिच्या दिसण्यामुळे अनेक वेळा तिला तडजोड करावी लागलेली..उत्तम अभिनय येत असूनही निव्वळ कुरूप असल्याने शाळेच्या नाटकात सहभाग नाकारलेला…खूप साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन वावरणारी…प्रेमाची आसुसलेली…पण नेहमीच लाथाडली गेलेली..भाऊ बहीण सुंदर…तीच अशी कुरूप..
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…त्यातील एक होते वेडे कुरूप ..तशीच ती सगळ्यांमध्ये असूनही वेगळी राहिलेली की आपोआपच वेगळी झालेली..!.वयाबरोबर शिक्षण आणि इतर गोष्टी होत गेल्या…थोडी हुशार होती म्हणून नोकरी मिळालेली…तिला त्याची जाणीव होती जणू की लग्नाच्या बाजारात आपल्याला किंमत नसणार किंमत असणार ती फक्त पैश्याला…तिचा अंदाज बरोबर होता…लग्न झालं ..नोकरी मुळे… संसार ही उभा राहिला.. वारंवार तू कुरूप आहे…थोबाड बघ आरश्यात…तुझ्या सोबत कोण राहील? अश्या एक ना अनेक गोष्टी ऐकत तडजोडी वर आधारलेला संसार..
नशीब तर गांडू होतंच… अपत्य ही झाली त्यात काही विशेष नव्हतं…कुरूपतेचा शाप पदरात घेऊनच वयाची अनेक वर्षे पार पाडली… किंबहुना कशी गेली…ढकलली काही कळलं नाही… पण गेली कशी तरी…
बाई ने सुंदरच असावं…आणि जी सुंदर नाही तिने अपमान सहन करावेत…समाजाच्या कुत्सित नजरांना उत्तर द्यावं… मनातल्या मनात तडफडावं… संघर्ष करावा.. तिला काहीच सहज मिळणार नाही… तिने ती अपेक्षा ही ठेवू नये… तिच्या जवळ येणारा संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो की पुरुष तिच्या पैशासाठी ,स्वार्थासाठी जवळ येणारा.. ती कुरूप असली तरी तिला एक मन आहे..ते प्रेमाचं भुकेलं आहे..ती एक माणूस आहे… तिला वेदना होतात..मन दुखावत..याच कोणालाही सोयरसुतक नाही…
खरंच कुरूप असणं इतकं भयानक असतं.. मनाचे तुकडे करणारं… मन सुंदर असू शकत… याची जाणीव कोणालाच नसावी…?फक्त सुंदर चेहराच सर्व काही असत ?एखाद्या व्यक्तीचं मन सुंदर असेल आणि ती कुरूप असेल तर समाज तिला कधी स्वीकारेल.. स्वीकारेल की नाही ? या समाजात गुणांना काहीच महत्व नाही ? कधीतरी समाजाची,लोकांची मानसिकता बदलेल का ?






