India

मनावर थेट घाव घालणारा…”जय भीम”..! सर्वांनीच पहावा…विशेषतः अधिकारी आणि पोलीस..!व्यवस्थेला पार उधडून टाकणारा…आज देखील वास्तव मांडणारा…”जय भीम”..!

मनावर थेट घाव घालणारा…”जय भीम”..! सर्वांनीच पहावा…विशेषतः अधिकारी आणि पोलीस..!व्यवस्थेला पार उधडून टाकणारा…आज देखील वास्तव मांडणारा…”जय भीम”..!

कालच जय भीम हा चित्रपट पाहिला आतापर्यंत पाहिलेल्या शेकडो चित्रपटात हा सर्वात जास्त आवडलेला चित्रपट… चित्रपट दाक्षिणात्य आहे.ह्या चित्रपटाची कथा ही १९९४-९५ मधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटातुन भारत देशाच्या अनेक मुद्द्यांचे सुंदर चित्रण किंवा धाडसाने चित्रण करण्यात आले आहे.

जय भीम…असं कोणी चार चौकात बोललं तर अनेकांचे कान टवकारतात, नजरा बदलतात. अशा परिस्थितीत जय भीम हे सिनेमाचं टायटल ठेवणंच मुळात धाडस आहे.

हा चित्रपट खालील मुद्द्यांवर भाष्य करतो..थेट काळजाला हाथ घालतो..

  • भारतात आजही जातीवाद शिगेला आहे.
  • आजही भारतात आदिवासींवर रोज अत्याचार होत आहेत.
  • आजही भारतातील सरकारी यंत्रणेत सर्वाधिक भ्रष्टाचार आहे.
  • भारतात आजही जात, दर्जा पाहून न्याय दिला जातो.
  • भारतीय स्त्री चा हीन आणि दुय्यम दर्जा

१) राजकीय भेदभाव – सरपंचापासून ते आदिवासी समाजापर्यंतचे सर्व सरकारी कर्मचारी कसे वागतात, हे चित्रपटात खूप छान दाखवण्यात आले आहे.

२) पोलीस प्रशासन जातीच्या आधारावर कसा अन्याय करते याचे उत्तम चित्रण केले आहे.
३) जातिवादामुळे न्यायालयात कसा न्याय होतो हे दाखवले आहे.

काय संदेश देतो चित्रपट

तुमच्यासाठी लढणारी व्यक्ती प्रामाणिक असेल तर तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. – अधिवक्ता चंद्रू

न्यायालयातील अधिकारी प्रामाणिक असतील तर तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. – उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (2 न्यायाधीश)

तपासी पोलिस अधिकारी प्रामाणिक असतील तर तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. महानिरीक्षक पेरुमलसामी

चित्रपट पाहिल्यानंतर प्रश्न..

१) चित्रपटात दाखवलेले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे, पण आजही भारताच्या अनेक भागात आदिवासी आणि इतर मागासलेल्या लोकांवर अत्याचार होतात, तरीही आपण गप्प का आहोत???

२) आपण सरकार आणि इतर प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज का उठवत नाही???

३) आपण चित्रपटांची वारंवार स्तुती करतो पण ही व्यवस्था बदलण्याबद्दल का बोलत नाही???

4) चित्रपटातील सर्व पात्रांनी उत्तम काम केले आहे. पण आपण आपलं पात्र चांगलं का बजावत नाही???

5) आजही खोटे गुन्हे आदिवासीं वर दाखल केले जातात.आपण हतबल का..?

6)जे आवाज उठवितात त्यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे सत्र सुरू आहे.. तरीही आपण मूग गिळून गप्प का..?

7)प्रश्न विचारणारा आदिवासी समाज व्यवस्थेला चालत नाही का..?

काल पाहिलेला जय भीम चित्रपट सध्या भारतवासियांच्या मनावर गारुड घालतोय. हा तामिळ चित्रपट तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. तो समाजातील वास्तवतेचे भान दाखवून देतो आणि भारतीय समाजमनावर जातिव्यवस्थेचा पगडा किती गहिरा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो..

असे आहे चित्रपटाचे कथानक

हा चित्रपट नव्वदीच्या दशकात झालेली सत्या कथा आहे. या चित्रपटामध्ये आदिवासी समाजातील पुरुषांना पोलीस जबरदस्तीने खोट्या आरोपांमध्ये गुंतविले जाते.त्यांचा अतोनात छळ करतात की पडद्यावरील दृश्य पाहून तुम्ही देखील रागाने चवताळून उठाल.पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. हे संपूर्ण कथानक त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकनूच्या भोवती फिरत. त्याला पोलीसांनी नेल्यानंतर त्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे. हे संपूर्ण कथानक न्यायालय, तमिळनाडूमधील छोट्याशा गावात आणि जेलमध्ये झाले आहे.

थेट मनावर वार

हा चित्रपट केवळ पोलिसांच्या क्रुरतेवर भाष्य करणारा नाहीये. तर क्रूर हिंसाचाराला जन्म देणार्‍या मानसिकतेचा आहे. या चित्रपटामधील थीम साधी ठेवली गेली होती. जेणेकरून प्रेक्षकांना स्वतःला यातील फरक जाणवू शकेल. उच्च आणि नीच असा भेदभाव सामान्यपणे न मांडता तो रोखठोकपणे सांगितले आहे. जसे की या कथेत राजकनूची पत्नी गावतील सरपंचाकडे मदतीसाठी जाते. तेव्हा तीला तेथे जातीवचक बोलून त हकलून दिले जाते. त्यानंतर राजकनू आणि त्याच्या पत्नीला मदत करणाऱ्या शिक्षिका देखील नेत्यांकडे दाद मागताता की यांचे नाव मतदान यादीत घ्या. तेव्हा तेथील उपस्थित नेता आता मतांसाठी या खालच्या जातीच्या लोकांच्या घरात त्यांची मनधरणी करायला जायच का ? असा प्रश्न केला यावरुन समाजातील परिस्थितीची भिषणता लक्षात येते.उच्चवर्णिय आणि जमीनदारांना प्रशासनाची आणि पोलीसांची साथ मिळाल्यावर काय होते. खोट्या केसेस टाकून एका आदिवासी आणि मागासवर्गाची कशी पिळवणूक केली जाते हे अत्यंत धाडसानं कुठलीही भाडभीड न ठेवता मांडलं आहे. हे सगळं बघताना अंगावर काटे येतात.विचार करा जे प्रत्यक्ष अनुभवतात हे प्रसंग त्यांचं काय होत असेल..?

सिनेमॅटोग्राफीचे यश

चित्रपटाची उत्तम सिनेमॅटोग्राफी ही कथानकासोबत चालते. चंद्रू आणि आयजी पेरुमलसामी यांच्या पात्रांप्रमाणे. ज्यांची भूमिका सूर्या आणि प्रकाशराज यांनी केली आहे. त्याच प्रमाणे गावतील सरपंचाची बायको त्या आदिवासींना पाहण्याच्या तो लूक सर्व काही सांगून जातो. या दृष्टीला खरंच दाद द्यायला हवी! चित्रपटाचा सर्वात मोठा स्टार सुर्या वाटतो पण या चित्रपटाची स्टार सेंगानी आहे. म्हणजे राजकनुची पत्नी. अभिनेत्री लिझो मॉल जोसने हे पात्र साकारले आहे. राजकनू तुरुंगात गेल्यावर कथेचा भार सेंगानीवर पडतो. जी तिने उत्तमरित्या स्वीकारली. त्याच्यासमोर सूर्या आणि प्रकाशराजसारखे अभिनेते होते. पण तरीही ती सरस ठरली आहे.

सुपरस्टार सूर्याने साकारलेले के. चंद्रू हे खऱ्या कथेतील वकील..आहेत तरी कोण

सुपरस्टार सुर्या शिवकुमार यांनी साकारलेले के. चंद्रू हे माजी न्यायमूर्ती चंद्रू आहेत. माजी न्यायमूर्ती चंद्रू यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला आहे. सूर्याचे हे पात्र मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू यांच्याकडून प्रेरित, ज्यांनी अनेक वर्षे वकील म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू यांची भूमिका साकारण्यापूर्वी सूर्या यांनी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू त्यांची भेट देखील घेतली होती. न्यायमूर्ती चंद्रू, जे त्यावेळी वकील होते, त्यांनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध धैर्याने लढा दिला. इरुलर समाजातील एका आदिवासी महिलेने पोलिसांकडून कोठडीतील छळ आणि पोलिस कोठडीत पतीचा मृत्यू याविरोधात न्यायालयात लढा दिला. न्यायमूर्ती चंद्रू यांनी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली होती. न्यायाधीश चंद्रू हे भारतातील प्रख्यात न्यायाधीशांपैकी एक आहेत आणि त्यांचा ऐतिहासिक ट्रॅक रेकॉर्ड आहे.

आयएमडीबी रेटिंगमध्येही अव्वल

या चित्रपटाला दमदार असे आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे. आयएमडीबीने या चित्रपटाला 9.7 रेटिंग दिले आहे. त्यामुळे मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

पुरोगामी महाराष्ट्राला आणि बॉलिवूड ला जे जमलं नाही ते साउथ ने केलं

संपूर्ण चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात.एका अतिशय महत्वपूर्ण आणि ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारा चित्रपट.. जातीयवादी मानसिकता स्पष्ट करणारा..बेधडक विषय मांडला आहे..जे स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्र आणि बॉलिवूड ला जमलं नाही ते साऊथ च्या दिग्दर्शकानीं करून दाखवलं..एक भयानक विदारक सत्य मांडलं.. ज्यात स्वातंत्र्या नंतर 75 वर्षात देखील बदल झाला नाही. बॉलिवूड ने फक्त मनोरंजन दिल मराठी ने काही सिनेमे दिले पण जय भीम ने दाखवून दिलं की मनोरंजनातून देखील प्रबोधन चळवळ करता येते.हिंदी आणि मराठी सिनेमांकडून अशी अपेक्षा ठेवणं आणि त्यांना अस थेट भाष्य करणं जमेल अस वाटण म्हणजे बापरे थेट नाहीच उत्तर आहे…

आजही आदिवासी, दलित,स्त्रियांचे शोषण होते.पध्दती बदलल्या,मार्ग बदलले पण शोषण थांबले नाही.आजही एखादी चोरी झाली तर आदिवासीं ना आधी दोषी मानले जाते. ह्या चित्रपटात शोषण सर्वांचेच दिसते मग ती आदिवासी स्त्री असेल तो राजकनू असेल त्याचे सहकारी असतील..25 वर्षे आदिवासी म्हणून काम करताना असे अनेक प्रकरणे हाताळली आहेत. आता तर काय जो आदिवासी असेल आणि आवाज उठवेल त्याच्या वरही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आदिवासी बांधवा जागा हो संघर्षाचा धागा हो…उठ आणि चवताळून वार कर ..शिका, संघटित व्हा संघर्ष करा ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीची आठवण ठेवून अन्यायावर प्रहार कर…शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे आणि तेच आपल्याला तारणार आहे..हीच शेवटच्या सिन मधील शिकवण..मला सर्वात जास्त आवडलेला प्रसंग… ज्यात राजकनू ची मुलगी हातात पेपर घेऊन एकदम थाटात खुर्चीत बसते…

चित्रपटात काम करणारे सुपरस्टार सूर्या, प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन आणि सिनेमातल्या सर्व कलाकार,टेक्निशियन यांचं सर्वांचं उत्कृष्ट टीम वर्क..उत्तम अभिनय..वास्तवाकडे नेणारा… दिगदर्शक ज्ञानवेल यांनी हा सिनेमा जबरदस्त प्रभावी केलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञांनी सिनेमात प्राण ओतलाय. सगळ्यांना मानाचा… ‘जय भीम’….

गांधी नेहरू जैसे बडे नेता हैं यंहा.. आंबेडकर दिखाई क्यूँ नहीं देते…!

ले. संपादकीय..प्रा जयश्री दाभाडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button