? प्रेरणादायी…हातात एके 47..दिसायला नितांत सुंदर नाजूक आणि 16 अतिरेक्यांना यमसदनी पाठवते ती…
प्रा जयश्री दाभाडे
अत्यन्त सुंदर, नाजूक आणि निसर्ग नियमानुसार एक स्त्री आणि एक आई म्हणून जीची ओळख असायला हवी किंवा सनातनी विचारांप्रमाणे ती घरातच राहायला हवी…सुंदर पदार्थ बनविण्यात,सुंदर दिसण्यात,ओट्या वरच्या गप्पा मारण्यात तिने वेळ घालवावा.. पती समोर जास्तीत जास्त नाजूक आणि सुंदर बनवून तिने स्वतःला प्रदर्शित करणे पुरुष प्रधान संस्कृती च्या अलिखित नियमांच्या तीन तेरा वाजवत धज्जीया उडवत ती हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची संघर्ष कहाणी आणि प्रेरणादायी प्रवास स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती असायलाच हवी
अत्यन्त सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आणि साहसाची कल्पनाही करू शकणार नाही. एक सामान्य स्त्री लाखो करोडो सामान्य असामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली पाहिजे. असं तर प्रिंट मिडिया,मास मीडिया सोशल मीडियावर तिच्या कर्तृत्वाचा उहापोह होऊन तिचा प्रेरणादायी प्रवास समाजासमोर आला पाहिजे.एखादा बॉलिवूड चा सेलिब्रिटी मरतो किंवा साधा आजार झाला तरी सतत मिडीया वर दिवसरात्र गोडवे गायले जातात. पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं. त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात।
आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली. युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते. तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना 6 वर्षाचा मुलगाअसून संजूक्ताची आई त्याला सांभाळते.
संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली. बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. शेकडो लोकांचे बळी गेले होते. आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं.. हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरते तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळतं.अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते. तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या. परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही. तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीत…अफाट कर्तृत्व..
आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे. देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे.अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीचा हा अफाट प्रवास,कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा.आणि हा अत्यन्त प्रेरणादायी प्रवास सामान्य महिलेपर्यंत जन सामान्य माणसा पर्यंत पोहचायला हवा…एक स्त्री,आई,काय करू शकते…हातात पाळण्याची दोरी धरणारे हात जेंव्हा जेंव्हा अन्याया विरोधात कलम,एके 47 धरतात तेंव्हा तेंव्हा परिवर्तन, समाज बदल,आणि क्रांती घडते यात शंका नाही….
#I_Salute_Sanjukta_Parashar






