Kolhapur

कोल्हापूरातील उचतच्या मायलेकाचा पहिला अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूरातील उचतच्या मायलेकाचा पहिला अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर: आनिल पाटील

उचत (ता. शाहूवाडी) येथील कोरोनाग्रस्त मुलगा व आईचा पहिला अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी ही माहिती दिली. एकाच गावात कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्याने हादरलेल्या जिल्हा प्रशासनाला या अहवालामुळे दिलासा मिळाला आहे.

या मायलेकाचे नमुने मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यासह कोल्हापुरात सुरू केलेल्या प्रयोगशाळेतही या दोघांचे नमुने आज तपासण्यात आले, तेही निगेटिव्ह आले असून क्रॉस तपासणीसाठी हे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठविण्यात आले. हा अहवालही निगेटिव्ह आला तर कोल्हापुरात प्रत्यक्ष तपासणी सुरू केली जाणार आहे.

उचत (ता. शाहूवाडी) येथील 30 वर्षीय तरूणाला मर्कजवरून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कांत 450 हून अधिकजण आल्याने प्रशासन भयभीत झाले होते. दि.9 एप्रिलला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ दि. 11 रोजी त्याच्या आईचा अहवालही पॉझिटिव्ह आला. दि.15 रोजी त्याचा चुलत भाऊही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. एकाच गावात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेने उचतवर लक्ष केंद्रीत केले होते.

या तरूणासह त्याच्या आईचा उपचाराचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. यानंतर या दोघांचे नमूने तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले. याच दरम्यान त्यांचे नमूने कोल्हापुरातील प्रयोगशाळेतही तपासण्यात आले. या दोन्ही ठिकाणी त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापुरात निगेटिव्ह आलेल्या स्वॅबचे नमूने पुन्हा पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचेही रिझल्ट सारखेच आले तर कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे नियमित तपासणी सुरू केली जाणार आहे, असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button