आरोग्याचा मुलमंत्र…जुनाट पित्ताचा आजार व त्या वर घरगुती उपाय
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स'(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा.
उपाय :
1) ताजे ताक
ताजे ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो.
मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. ताक पोटातील ऍसिडिटी शमवण्याचे काम करते.
2) गूळ
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्यांची शक्ती वाढते. तसेच जेवण संपवताना एक गुळाचा खडा खाल्यास अन्नपचन चांगले होते.
गुळामुळे आपली पचनसंस्था अल्कलाईन राहते व ऍसिडिटी कमी होऊन समतोल साधला जातो. उन्हाळ्यात तर गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराचे तापमान नियमित राखण्यास मदत होते.
3) आलं
आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत. आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाहशामक गुणधर्म आहेत. पोटातील ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास फायदा होतो.
मळमळ, उलटी, पित्त वाढणे ह्यावर आल्याचे पाचक हे तर सर्वोत्तम औषध आहे.
4) शहाळ्याचे पाणी
शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील ऍसिडिक लेव्हल कमी होऊन अल्कलाईन होते. ह्याने पोटात आवश्यक असलेले म्युकस सुद्धा तयार होते.
यामुळे अतिरिक्त प्रमाणात ऍसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते. शहाळ्याच्या पाण्याने अन्नपचन सुधारते व ऍसिडिटी वाढणे कमी होते.
5) तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात. त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.
एवढं करून सुद्धा त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांना त्वरित भेटा.
डॉ किशोर बाळासाहेब झुटे (पाटील)
( होमिओओपॅथिक तज्ञ )






