Amalner: वडाची पूजा तिने केली पण तो सत्यवान नव्हता..!
अमळनेर तालुक्यातील एक धक्कादायक घटना वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी घडली आहे.शहरातील तांबेपुरा मारुती मंदिरा शेजारील एका इसमाने त्याच्या पत्नीला जबर मारहाण करून घरातच ३ ते ४ दिवसापासून डांबून ठेवले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की,अमळनेर तांबेपुरा भागातील मारुती मंदिरा शेजारील एकाने पत्नीला जबर मारहाण करून घरात तीन ते चार दिवसापासून कैद केल्याची माहिती महिला संरक्षण अधिकारी यांना अज्ञात व्यक्तीने दिली. त्यावरून चौधरी यांनी तात्काळ आधार समुपदेशन केंद्रातील रेणुप्रसाद व त्यांचे दोन सहकारी ज्ञानेश्वरी पाटील व मोहिनी पाटील यांची मदत घेऊन सदर ठिकाण गाठले. त्या घरात सदर महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती.त्यांनी तात्काळ खाजगी वाहनाने पीडितेला प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलिसांना कळवून त्यानंतर त्यांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. परंतु महिलेची स्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी तिला धुळे येथे रवाना केले. दरम्यान पत्नीवर अशा पद्धतीने जबर मारहाण करणाऱ्या नवऱ्यावर महिला संघटनेने पुढे येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी होत आहे.






