?️बॉलिवूड Breaking…अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
अभिनेते रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा आज गुरुवारी केली. दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण ३ मे रोजी होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.
देशातील सर्व भागांतील चित्रपट निर्माते, अभिनेता, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार महान नायक रजनीकांत यांनी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली ५ दशके चित्रपटसृष्टीवर राज करत आहेत. ते लोकांचे मनोरंजन करत आहेत. यामुळे यावेळेचा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले.
आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या पाच ज्युरींनी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची शिफारस केली होती.
मराठमोळे शिवाजीराव गायकवाड अर्थातच रजनीकांत यांनी तमिळसोबतच हिंदी चित्रपटांतूनही अफाट लोकप्रियता मिळवली आहे. त्यांचा जन्म १२ डिसेंबर, १९५० या दिवशी बंगळूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. १९७७ साली तेलुगु चित्रपट ‘शिलगम्मा चेंपिडी’मध्ये रजनीकांत यांना पहिली मुख्य भूमिका साकारली. १९७८ साली भैरवी या चित्रपटाने रजनीकांत यांना सुपरस्टार बनवले. १९८० साली डॉनचा रिमेक आल्यानंतर रजनीकांत यांना साऊथचा अमिताभ अशी ओळख मिळाली. पाय फिरवून वावटळ उठवणारा, सिगारेट पेटवण्याची स्टाईल, गळ्यातला मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात अडकवण्याची स्टाईल, गॉगल घालण्याची त्यांची स्टाईल लोकप्रिय ठरली.






