Jalgaon

?जळगांव Live…डॉ. सुधीर मेश्राम नावाचं झंझावती वादळ कायमचं शमलं!! मृत्यूकार विनोद अहिरे

? जळगांव Live…डॉ. सुधीर मेश्राम नावाचं झंझावती वादळ कायमचं शमलं!! मृत्यूकार विनोद अहिरे

होय, डॉ. सुधीर मेश्राम यांच्या जाण्याने एका झंझावाताची आखेर झालेली आहे. झंजावाती वादळातही त्यांच्या कर्तृत्वाची ज्योत अखंडपणे तेवत होती; परंतु ती ज्योत दि.१५/०३/२०२१ रोजी कायमची विझली.

डॉ. सुधीर मेश्राम यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समाज माध्यमांवर समजली प्रथम तर, बातमीवर विश्वासच बसला नाही; पण चौकशी केली असता बातमी खरी होती. आणि वेदनेची एक सणक मस्तकात शिरशिरली. डॉ. मेश्राम साहेबांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व मन:चक्षू समोर उभे राहिले. जळगाव जिल्ह्यातील त्यांचा कवयत्री बहिणाबाई विद्यापीठातील त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ स्मृतींच्या रंगभूमीवर अभिनय रूपाने समोर आला. ज्याप्रमाणे रंगभूमीवर नायकाच्या ओठांवर स्मित हास्य असतं; परंतु काळजात मात्र अनेक जखमा आणि वेदना जपत तो आपला अभिनय लिलया साकारत असतो. त्याचप्रमाणे डॉक्टर मेश्राम यांनी प्रत्यक्ष जीवनाच्या रंगभूमीवर परिस्थितीच्या जिंदम बाणांनी घायाळ होऊन सुद्धा कर्तृत्वाचा अभिनय अत्यंत सशक्तपणे साकारलेला होता.आणि त्यातून जन्म झाला होता एका संघर्ष नायकाचा. तो नायक अमरावती च्या हमाल पुराच्या झोपडपट्टीत मिणमिणाऱ्या उजेडात पुस्तकातील शब्दन् शब्द टिपणाऱ्या डोळ्यांमध्ये कर्तृत्वाचा यज्ञकुंड धगधगत होता. त्या यज्ञकुंडात त्यांनी अक्षरशः वेदनेची आणि आक्रोशाची समिधा अर्पण केली. आणि त्या यज्ञकुंडातुन जन्म घेतला एका कर्तुत्वान कुलगुरूचा.

हमालपुरा ते कुलगुरू हा प्रवास काही साधा नव्हता. त्या प्रवासाच्या वाटेवर ठिकठिकाणी काटेरी कुंपणे होती. तरीसुद्धा ते काटेरी कुंपण त्यांच्या आत्मविश्वासाला घायाळ करू शकलं नाही. कारण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांचं लोहत्राण आपल्या शरीरावर, मस्तकावर परिधान केले होतं

आम्ही अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकली त्यामधून शोषित,पीडित, कष्टकरी समाजाबद्दल असलेली त्यांची तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. म्हणूनच ते नेहमीच म्हणत की, “मुझे मोहल्लेमे लेके चलो” हुडको सारख्या झोपडपट्टी परिसरात, भीम जयंतीच्या कार्यक्रमात तेथील मुलांना अत्यंत तळमळीने सांगायचे की, शिक्षणामुळे एका झोपडपट्टीतील माणूस सुद्धा कुलगुरू होऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून भारतीय संविधानाचा कसा जन्म झाला आहे, ते तळमळीने सांगायचे. आपणाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर होता येत नसलं तरी, आपण त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.

आम्हाला प्रत्यक्ष मेश्राम साहेबांशी फक्त एक वेळा संवाद साधण्याचा प्रसंग आला. 201४ मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल भगत आणि आमच्या पुढाकाराने जळगाव पोलीस मुख्यालय मध्ये पहिल्यांदाच भीम जयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम आणि पोलीस अधीक्षक जालींदर सुपेकर होते.आम्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना मध्ये मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा संदर्भ देखील देत होतो. मा. मेश्राम साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये आमच्या सूत्रसंचालनाचे कौतुक तर केलेच पण कार्यक्रम संपल्यावर देखील आमच्या पाठीवर कौतुकाने हात ठेवून मेश्राम साहेब म्हणाले, की तुम्ही भविष्यात मोठे वक्ते होणार असा आशीर्वाद देखील त्यांनी दिला. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हाताचा स्पर्श आजही आम्हाला तसाचा तसा जाणवतो‌ आणि आम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा देत असतो. म्हणूनच आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा “मृत्यू घराचा पहारा” हे पुस्तक लिहू शकलो.

मेश्राम साहेबांनी अनेक उच्चपदस्थ ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील कुलगुरू पदाचा कार्यकाळ विशेष गाजला याच कालावधीत डॉक्टर मिलिंद बागूल यांनी हमालपुरा ते कुलगुरू हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं, त्यामुळेच त्यांच्या जीवनातील संघर्ष सर्वांना समजला. विद्यापीठात भविष्याचा वेध घेऊन केलेल्या अनेक सोयीसुविधा, शोषित पीडित कष्टकर्‍या बद्दलची तळमळ, त्यांचं कर्तुत्व त्यांचे विचार विद्यापीठाच्या आणि जनतेच्या कायमच स्मरणात राहणार आहेत.त्यांचं अचानक जाण्याने देशाने एक सृजनशील, कर्तुत्ववान अधिकारी गमावला आहे.
त्यांच्या स्मृतींना आम्ही विनम्रपणे अभिवादन करतो.

विनोद पितांबर अहिरे
९८२३१३६३९९

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button