‘करोना’बाबत सहकार्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना-डॉ राजेंद्र भारुड
फहिम शेख
नंदुरबार दि. 24- करोना विषाणूचा प्रसाराबाबत नागरिकांच्या शंकांचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02564-210006 असा आहे. या क्रमांकावर नागरिकांना आपल्या सुचना अथवा तक्रारी सादर करता येतील. जिल्हा रुग्णालयातदेखील नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 02564-210135 असा आहे.
रेल्वे स्टेशन नंदुरबार करोना कक्षाचा संपर्क क्रमांक 9004471940 असा, तर खांडबारासाठी 02267642348 आहे. नवापूर रेल्वे स्टेशनच्या करोना कक्षाचा क्रमांक 02267642357 आहे. जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी कार्यालया करोना नियंत्रण कक्षाशी 9423378279 असा आहे. पोलिस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 02564-210113 असा आहे.
तालुकास्तरावर संबंधित तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक शहादा (02565-224500/9420623634), तळोदा (02567-232367/9404375979), अक्कलकुवा (02567-252226/8007068419), नवापूर (2569-250040/8605755954), अक्राणी (02595-220232/9404586140) आणि नंदुरबार (02564-232269/8605916346) असे आहेत.
नागरिकांनी केवळ करोना आजाराबाबतच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. चुकीची आणि खोडसाळपणे माहितीदेणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करून जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नियंत्रण कक्षाकडून प्रत्येक घटना अथवा माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी जिल्ह्यातील महसूल व पोलीस यंत्रणेशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना गर्दी कमी करण्यास प्रवृत्त करावे. दिलेल्या सुचनांचे पालन होत नसल्यास कडक कारवाई करावी. आजाराची प्राथमिक लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन अशा व्यक्तिंना घरीच क्वॉरंटाईन करावे व लक्षणे वाढल्यास प्रशासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली क्वॉरंटाईन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्याच्या सर्व सीमांवर सुरक्षेचे पुरेसे बंदोबस्त करून बाहेरील वाहनांना शहरात प्रवेश करू देऊ नये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
क्वॉरंटाईन केंद्रात आवश्य सुविधांची निर्मिती
जिल्ह्यात अधिग्रहीत केलेल्या सात क्वॉरंटाईन केंद्रात आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. याठिकाणी स्व्च्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली बेड्स आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या काळात जिल्ह्यात विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.
—-






