Amalner: खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस नोकर भरतीचा प्रश्न ऐरणीवर..तक्रारदार लोटन चौधरी यांचे थेट आयुक्तांना पत्र..!
अमळनेर खाशिच्या तत्कालिन संचालकांसह शिक्षण विभागातील जबाबदारांच्या अपसंपदेच्या चौकशीची मागणी तक्रारदार लोटन चौधरी यांचे सायबर क्राईम आयुक्तांना पत्र
अमळनेर राज्यातील टीईटी प्रकरण धगधगते असून शिक्षण खात्यातील बोगस भरती प्रकरणातील अधिकार्यांची मालमत्ता जप्त करत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू आहे. यातच खान्देश शिक्षण मंडळ संचलित विविध शाखांमध्ये झालेला बोगस नोकर भरतीचा मुद्दाही ऐरणीवर आलेला आहे. खान्देश शिक्षण मंडळ संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीबद्दल चौकशी करून संचालकांसह संबंधित जबाबदार अधिकार्यांची मालमत्ता जप्त करावी अशा मागणीच्या आशयाचे पत्र लोटन महारू चौधरी यांनी पुणे येथील सायबर क्राईम आयुक्तांना पाठवले आहे. खा.शि.मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी हे प्रकरण लावून धरल्याने काही संचालकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चौधरी यांनी सायबर आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे, की आपण सन 2017 पासून शिक्षण उपसंचालक-नाशिक, शिक्षणाधिकारी-जळगाव, शिक्षण संचालक-पुणे यांच्याकडे अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, डी.आर. कन्या शाळा, प्रताप हायस्कूल, जी.एस. हायस्कूल आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या संस्थेत सन 2012 नंतर शासनाच्या नियमांचे उलंघन करून तत्कालिन संचालकांनी लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण करून सन 2017 पासून बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती राबविलेली आहे. सदर तक्रारीची 18+4 असे 22 शिक्षक तसेच 4 शिक्षकेतर कर्मचारी यांची सुनावणी घेऊन चौकशी केली आहे. त्यात सदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रकरणे बोगस आढळली आहेत. त्यांचे प्रस्ताव कोणत्याही कार्यालयात मागणी केल्यानंतर प्राप्त नाहीत. नेहमी टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात व कारवाई करण्यास शासन, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक हे सर्वच टाळाटाळ करत प्रकरण लांबवत असल्याचे नमूद केले आहे.
तत्कालीन शिक्षण उपसंचालक, नाशिक रामचंद्र जाधव निवृत्त झाले आहेत. त्यांच्या अपसंपदेची 1985 ते 1990 या वर्षी चौकशी झाल्याचे कळते. परंतु खरा भ्रष्टाचार नाशिक विभागात शिक्षण उपसंचालक, नाशिक येथे रुजू झाल्यानंतर ते निवृत्त होईपर्यंत त्यांनी केला आहे. बोगस शिक्षक भरती प्रक्रिया राबवत करोडोंची माया त्यांनी जमवली आहे. त्यांच्यानंतर आलेले बच्छाव व उपासनी यांनीही ह्याचप्रकारे खोटी कामे करत भ्रष्टाचार केला. या सर्वांच्या कारकिर्दीत बोगस प्रकरणे हाताळली गेली आहेत.
यासह जळगाव येथील शिक्षणाधिकारी हिंगोणेकर, बी.जे. पाटील यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीत सन 2012 नंतर प्राथमिक व माध्यमिक विभागाची बोगस शिक्षक भरती प्रक्रियीतेली प्रकरणे हाताळून मंजूरी दिलेली आहे. तर बोगस टीईटी प्रकरणातही काही महाभाग सहभागी आहेत. त्यामुळे आपण यासर्वच भरती प्रकरणांची, संबंधित सर्वांच्या अपसंपदेची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.






