निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागे झाले “स्थानिक” राजकीय पुढारी
सूत गिरणीला शह देण्यासाठी दूध संघाची निर्मिती???….
प्रा जयश्री साळुंके
अमळनेर येथे नुकत्याच “व्यावसायिक”?की “राजकीय” दृष्टिकोन समोर ठेऊन दोन महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.त्यात आमदार शिरीष दादा चौधरी आणि हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांनी सूत गिरणीच्या जागेच्या खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती 15 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली. सूत गिरणीमुळे तालुक्यातील बेरोजगारी चा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लगेच काही दिवसात सर्व पक्षीय?(की एकच समाज?)दूध संघाची घोषणा करण्यात आली. आता सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की हा विरोधाला विरोध आहे?…..जाती पातीच राजकारण आहे?…..की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला दिलेलं गाजर आहे?….गेल्या अनेक वर्षात दूध संघाच्या निर्मात्यांना अमळनेर शहरातील बेरोजगारी दिसली नाही. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र शहरातील बेरोजगार दिसला याला निखळ राजकारण म्हणावे की जनतेबद्दल प्रेम? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे.“बाहेरून आलेल्या” आमदाराला शहरातील बेरोजगारी जाणवली आणि सूत गिरणीची संकल्पना उदयास आली. परंतु स्वतःला “स्थानिक” म्हणून मिरवणार्यांना मात्र कॉपी पेस्ट करण्याची वेळ आली. त्यातही दोन दिवसांपूर्वी जळगांव येथे झालेल्या दूध फेडरेशन च्या जळगांव जिल्ह्याच्या बैठकीत तालुका पातळीवर कोणतेही दूध संघास परवानगी दिली जाणार नाही किंवा मिळू नये असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केले.आधीच दूध फेडरेशन डबघाईला आले आहे आणि जळगांव चे दूध फेडरेशन राजकारण विरहित आहे अशा स्थितीत दुसरा दूध संघ निर्माण करणे हे योग्य नसून अमळनेर येथील दूध संघास मी मान्यता मिळु देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आता या स्थितीत काल झालेल्या अमळनेर येथील दूध संघाची बैठक आणि शेअर विक्री सुरू झाली असे सांगण्यात आले यात सामान्य नागरिक आर्थिक दृष्टीने फसू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका तालुक्याला परवानगी दिली तर सर्वच तालुक्यातील लोक मागणी करतील
अमळनेर शहरात जातीय राजकारण अनेक वर्षांपासून खेळलं जातं. ही परंपरा खूप जुनी आहे. जातीच्या बहुमताचा एक्का किंवा दादागिरी,बापूगिरी केली जाते. परंतु आता ही दादागिरी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकीय खेळी खेळली जात आहे.व्यवसाय आणि रोजगाराचे गाजर देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन मतदार आता या जातीय खेळींना बळी पडणार नाहीत असा सूर बहुजन मतदारांचा दिसून येत आहे







