Usmanabad

मैलारपूर येथील श्री खंडोबाच्या यात्रोत्सवास शुक्रवार पासून प्रारंभ

मैलारपूर येथील श्री खंडोबाच्या यात्रोत्सवास शुक्रवार पासून प्रारंभ

नळदुर्ग-उस्मानाबाद:-प्रशांत नेटके

नळदुर्ग:-महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग ता तुळजापूर)येथील श्री खंडेरायाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास शुक्रवारी (दि १०) प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे.
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रात श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत.
त्यातील नळदुर्ग(मैलारपूर)हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले.
हिच्या भक्तीसाठी बाणाईस चंदनपूराहून आणून नळदुर्गात विवाह केला व नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले अशी आख्यायिका आहे.
श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्ग मध्ये दोन मंदिर असून मूर्ती मात्र एकच आहे.
अणदूर मध्ये सव्वा दहा महिने व नळदुर्ग मध्ये पावणेदोन महिने मूर्ती ठेवण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे.
मूर्ती अणदूर येथून नळदुर्गला आणल्यानंतर यात्रोत्सव सुरू असतो.दर रविवारी भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यास खेटे असे संबोधले जाते. पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीला मूर्ती अणदूरला नेण्यात येते.

*१० व ११ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम*

*शनिवारी रंगणार कुस्तीचा फड*
नळदुर्गची महायात्रा पौष पौर्णिमेला भरते. यंदा १० व ११ जानेवारी रोजी पौर्णिमा असल्याने यात्रा महोत्सव दोन दिवस चालणार आहे.
शुक्रवारी (दि १०) पहाटे ४ वाजता काकडा आरती झाल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करुन अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे.
त्यांनतर महावस्त्र अलंकार पूजा करून महानैवेद्य वाढविण्यात येणार आहे. दिवसभर भंडारा व खोबरे उधळणे , विविध गावाहून आलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक ,लहान मुलांचे जावळ काढणे, तळी भांडार उचलणे आदी धार्मिक कार्यक्रम, रात्री १२ वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्याचे व अणदूरहुन आलेल्या घोड्यांचे आगमन होणार आहे. याचवेळी शोभेच्या दारूची आतषबाजी ,नंतर मध्यरात्री २ वाजता मंदिरात अणदूर व नळदुर्गच्या मानकऱ्यांचा सत्कार ,३ वाजता श्री ची छबिना मिरवणूक, शनिवारी ( दि ११) दु २ ते सायंकाळी ७ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button