Akkalkot

कोरोनाच्या पाश्वभूमीवर श्रीक्षेत्र अक्कलकोट वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने फूड पॅकेज वितरणाची सुरुवात

कोरोनाच्या पाश्वभूमीवर श्रीक्षेत्र अक्कलकोट वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने फूड पॅकेज वितरणाची सुरुवात

कृष्णा यादव, प्रतिनिधी

अक्कलकोट दि.28:- सध्या भारतात कोरोनाचा संसर्गमय प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. या पाश्वभूमीवर कोरोना आजारावर प्रतिबंध घालण्याकरिता केंद्र व राज्य शासन यांच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. या कोरोना विषाणूचा विस्तार वाढू नये या करीता अक्कलकोट शहरात शासन निर्देशानुसार अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी, निराधार गोरगरीब नागरिक यांना या संचार बंदीच्या काळात अन्न वितरणाची सुरुवात करून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या फूड पॅकेज (अन्न वितरण) वितरणाची सुरुवात येथील ग्रामीण रुग्णालयात वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक तसेच रुग्ण समिती सदस्य महेश इंगळे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांच्या हस्ते आरोग्य सेवकांना वितरित करून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांचा आज वाढदिवस असल्याने मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला व केक कापून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या नंतर शिवशरण इचगे यांच्या वतीने मोफत मास्क वाटप उपक्रमाची सुरुवातही महेश इंगळे व अशोक राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी जगभरासह आपल्या देशावर सध्या कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे शासन, आरोग्य सेवक, व पोलीस कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करून प्रत्येकाने घाबरून न जाता खबरदारी म्हणून स्वतःची काळजी घ्यावी.अशा संकटकाळी डॉक्टर हेच नागरिकांकरिता देवदूत असतात. याकरिता या वैद्यकीय सेवकांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या अनेक आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी, निराधार नागरिकांना अन्नदानाच्या माध्यमातून फूड पॅकेज वितरणाची सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता आपल्या सर्वांचे लाडके वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड व त्यांचे सहकारी आरोग्य सेवक हे सतत कार्यरत आहेत. डॉ. राठोड यांच्या समर्पित वैद्यकीय सेवेमुळे या क्षेत्रात त्यांचे अनमोल योगदान आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवरही ते नेहमी उत्साहाने जनतेची सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी इंगळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील अलगीकरण कक्ष व इतर सोई सुविधांबद्दल जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. सतीश बिराजदार, डॉ. नीरज जाधव, डॉ. रोहन वायचळ, डॉ. नरके, डॉ. पिरजादे, डॉ. पंडित पाटील, डॉ. प्रशांत बिराजदार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, संतोष पराणे, महेश काटकर, शिवाजी गुजर, महेश मस्कले, पवन पवार, अविनाश क्षीरसागर, संतोष जमगे, मनोज जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवकांना फूड पॅकेजचे वितरण करताना महेश इंगळे, डॉ. अशोक राठोड व अन्य दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button