Pune

दरड प्रवण क्षेञ धोकादायक गावांसाठी तात्काळ उपाययोजना करावी – ट्रायबल फोरम आंबेगांवची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

दरड प्रवण क्षेञ धोकादायक गावांसाठी तात्काळ उपाययोजना करावी – ट्रायबल फोरम आंबेगांवची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

मंचर : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

आंबेगांव तालुक्यातील आदिवासी दरड प्रवण क्षेत्रातील धोकादायक गावांबाबत तात्काळ उपाययोजना करावी याबाबत मागणी प्रांताधिकारी यांचे कडे ट्रायबल फोरम आंबेगांव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागातील पोखरीअंतर्गत बेंढारवाडी, जांभोरी अंतर्गत काळवाडी नं. १ व नं. २, मेघोली, माळीणअंतर्गत पसारवाडी तसेच फुलवडेअंतर्गत भगतवाडी ही दरड प्रवण क्षेत्रातील गावे अत्यंत धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, परंतु अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप या गावांचे पुनर्वसन झालेले नाही.
आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे ३१ जुलै २०१४ रोजी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला. गाव व वाड्यावस्त्यांवरील ७४ पैकी ४४ घरे, पुरुष, महिला, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर शासनाने धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यामार्फत करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २३ धोकादायक स्थितीत असलेल्या गावांचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील पोखरीअंतर्गत बेंढारवाडी, जांभोरीअंतर्गत काळवाडी नं. १, व नं. २, मेघोली, माळीणअंतर्गत पसारवाडी तसेच फुलवडेअंतर्गत भगतवाडी या अत्यंत धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. पुनर्वसनासाठी काही ठिकाणी जागाही उपलब्ध झाल्या; परंतु त्या ठिकाणी अद्याप कामे झालेली नाहीत. सध्या अत्यंत मुसळधार पाऊस सुरू झहल्याने प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे तरीही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप झाली नसल्याने या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे. ज्या ठिकाणी जागेची सोय झालेली आहे निदान त्या ठिकाणी तरी उपाययोजना करावी, अशी मागणी ट्रायबल फोरम आंबेगाव मार्फत लेखी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी यांना करण्यात आली आहे.

*सध्याची पावसाची स्थिति पाहून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तत्काळ धोकादायक गावांकडे उपाययोजना कराव्यात आदिवासी भागात पुन्हा माळीण सारखी दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घ्यावी*
– डॉ हरिश खामकर
अध्यक्ष, ट्रायबल फोरम आंबेगाव

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button