Mumbai

अशी साजरी होते आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी

अशी साजरी होते आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी..तारपा वाद्य आणि नृत्य याला असते महत्व..

प्रा जयश्री साळुंके

सम्पूर्ण भारतात दिवाळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
दीपावली हा दिव्यांचा सण असल्याने घरोघरी पणत्या आणि दिवे उजळले जातात.आदिवासी भारताच्या विविध भागांमध्ये वास्तव्य करतात.आदिवासी च्या एकूण 47 जमाती असून या सर्व जमातींमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने दिवाळी हा सण साजरा केला जातो.सर्वांचा आढावा घेणे तर शक्य नाही परंतु मुबई येथील आदिवासी पड्यांचा पारंपरिक परामर्श

आदिवासी पाड्यांवरही दिवे लावतात. मात्र हे दिवे म्हणजे पणत्या किंवा कंदील नसतात. दिवे लागणे ही त्यांची परंपरा आहे. घरोघरी दिवे लागले का, असे आदिवासी एकमेकांना विचारतात खरे, परंतु हे दिवे लागणे म्हणजे शेतात तयार झालेली चवळी, धान्य घरातील लहानग्यांना, कुटुंबीयांना देण्याची परंपरा.
मुंबईतील आदिवासी पाड्यांवर शहरी परंपरा आणि आदिवासींच्या मूळ परंपरा यांची सरमिसळ झाली आहे. तरीही अशा पद्धतीने दिवे लावण्याची परंपरा मात्र आवर्जून जपली जाते. घरातील भिंतीवर शेंदराची पाच बोटे टेकवली जातात. या भिंतीच्या खाली तांदळाची लहानशी रास रचतात. त्यानंतर नारळाचा प्रसाद देवाला दाखवला जातो. या काळात धान्याचे उत्पादन झालेले असते. दिवाळीमध्ये देवाला या धान्याचा प्रसाद दाखवल्याशिवाय ते धान्य वापरायला घेत नाहीत.

मुंबईमध्ये चवळीचे उत्पादन घेतले जाते. या चवळीच्या शेंगांचा प्रसाद देवासमोर ठेवला जातो. त्यानंतर दिवाळी दरम्यान कुटुंबप्रमुख घरातील सगळ्या सदस्यांना शेंगा आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटतो. या कार्यक्रमा दरम्यान घरातील सर्व सदस्य उपस्थित असणे गरजेचे असते. आदिवासी पाड्याबाहेर राहायला गेलेलेही अनेक आदिवासी आहेत. हे आदिवासी घरी परत येतात. एक सदस्य नसला तरी हे प्रसादवाटप होत नाही. दिवाळीचा आनंद नातेवाईकांनी एकत्र येण्यात असतो, त्यामुळे ही प्रथा पाळली जाते. या काळामध्ये पाड्यांवरचे स्थानिक एकमेकांना दिवे लागले का, असे विचारतात. हे प्रसादवाटप झाले की नवे धान्य स्वयंपाकासाठी वापरायला सुरुवात होते.

आदिवासींमध्ये पणत्या उजळण्याची परंपरा नाही. शहरांमध्ये पाहून आता आदिवासीही पणत्या उजळायला शिकले आहेत. पूर्वी निवडुंगाच्या खोडाचे लहान तुकडे करून त्यामध्ये दिवे लावले जायचे. निवडुंगाच्या खोडामध्ये तेल कमी शोषले जात असल्याने त्यामध्ये दिवे लावले जायचे.

ही परंपरा हळुहळू बदलत आहे. फटाकेही काही प्रमाणात पाड्यांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र आदिवासी जंगलामध्ये राहत असल्याने पक्ष्यांना त्रास नको म्हणून फटाके वाजवले जात नाहीत. या फटाक्यांच्या आवाजाने प्राणी-पक्षी बावचळतात. त्यामुळे अनेकांनी हे फटाके नाकारले आहेत. या परंपरांच्या जोडीला निसर्गाशी जवळीक साधत जमिनीवर सांडलेली फुले किंवा आजूबाजूची रानटी फुले वापरून रांगोळी सजवली जाते. निसर्गातीलच रंग पुन्हा निसर्गालाच परत केले जातात.

तारपाची परंपरा

दिवाळीमध्ये तारपा नृत्य हा आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा भाग असतो. मात्र मुंबईच्या पाड्यांमध्ये आजकाल तारपा वाजवणारे कोणी वादक फारसे उरलेले नाहीत. कोणाच्या तरी घरी तारपा वाद्य असते. तारपा नृत्य मात्र आदिवासींना येते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डहाणू किंवा जवळच्या भागातून तारपा वादकांना निमंत्रित केले जाते आणि मग दिवाळीमध्ये तारपा नृत्याचा आनंद घेतला जातो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button