Mumbai Diary:Thakrey vs Shinde: नेमकं काय घडलं शिवसेना भवनासमोर..!
मुंबईतील दादरच्या शिवसेना भवन परिसरात आयोजित एका गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट मिरवणुकीदरम्यान आमने-सामने आले. यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील दोन गट आमने-सामने येण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. पण कालच्या या प्रकरणात थेट गोळीबारापर्यंत विषय गेल्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊ.
मुंबईच्या दादर पश्चिम परिसरात शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय आहे. हा परिसर शिवसेनेचेच आमदार असलेल्या सदा सरवणकर यांच्या माहीम मतदारसंघात येतो.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सदा सरवणकर हे त्यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना भवन ज्या मतदारसंघात आहे, तेथील शिवसेना आमदारच उद्धव ठाकरेंच्या विरोधी गटात गेल्यामुळे येथे गेल्या काही दिवसांपासून राजकीय तणाव कायम आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत सर्वत्र मिरवणुकांची लगबग सुरू होती. येथील प्रभादेवी परिसरात शिवसेना पक्षाच्या वतीने (ठाकरे गट) नेहमीप्रमाणे एक मंच उभारण्यात आला होता. येथून गणेशभक्तांना सरबत वाटप केलं जात होतं. याच मंचाच्या बाजूला शिंदे गटात गेलेले आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनीही मंच उभारला होता.
शुक्रवारी (9 सप्टेंबर) रात्री मिरवणुका सुरू असताना शिवसैनिक (ठाकरे गट) आणि सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. यामुळे तणाव वाढला होता. पण पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
यानंतर पुन्हा काल म्हणजेच शनिवारी (10 सप्टेंबर) रात्री उशिरा ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच सरवणकर यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. याच दरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. पण सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. याविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रणय अशोक म्हणाले, “काल रात्री 12 ते 12.30 या वेळेत दोन गटात प्रभादेवी भागात फाईट झाली. या अनुषंगाने दादर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल केले आहेत.”
दोन्ही गुन्ह्यांमध्ये पाच ते दहा आरोपींवर दंगलीसंदर्भात केस दाखल केली आहे. आजच्या केसमध्ये आर्म्स अॅक्ट एफआयआर दाखल केली आहे. याची चौकशी सुरू आहे. आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांची ओळख पटताच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल,” असंही प्रणय अशोक यांनी सांगितलं.
प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. तर येथील विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह इतर पाच शिवसैनिकांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.
या कारवाईविरोधात शिवसेनेचे बडे नेते रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
माध्यमांशी बोलताना खासदार सावंत म्हणाले, “सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून दोन ठिकाणी गोळीबार केला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसैनिक गेले असता पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत.”
“शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. आमच्या अनिल परब यांनी कायद्याचा कीस काढून पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला,” असंही सावंत यांनी म्हटलं.
अखेर शिवसेना नेत्यांच्या मागणीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले महेश सावंत यांच्यासह पाच नेत्यांना सोडण्यात आलं.






