Big Breaking
6 मार्चला सादर होईल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प
पी व्ही आनंद
मुंबई
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याकडे महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागले होते.
मात्र, 6 मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारीला मुंबईमध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन:
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी 4 आठवड्याचा निश्चित करण्यात आला आहे. या अधिवेशनाचे कामकाज 18 दिवस चालणार आहे. 6 मार्चला 2020-21 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील हिंगणघाट जळीतकांड तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचाराची दखल घेण्यात येणार असून नराधमांना कठोर शिक्षा देण्यासाठी 5 मार्च रोजी चर्चा केली जाणार आहे.
विधान भवनात सोमवारी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशासंदर्भात चर्चा झाली.
यांच्या उपस्थितीत झाली बैठक :
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






