आरोग्याचा मुलमंत्र
अंजीर सेवनाचे फायदे
हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते.
अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
१) कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.
२) पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.
३) अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
४) अंजीराच्या नियमित सेवनाने सप्तधातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळेच क्षयरोगासारखे आजार बरे होऊ शकतात.
५) शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेल्या अंजीराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.
६) अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो.
७) पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.
८) दम्यावरही अंजीर गुणकारी आहे. अंजीर आणि लालसर पांढरी गोरख चिंच समप्रमाणात घेऊन रोज सकाळी एक तोळा खावी. त्यामुळे श्वसन क्रिया सुलभ होत दम्याचा त्रास कमी होतो.
९) अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते.
१०) अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथी तज्ञ )






