आरोग्य तंत्रज्ञानाचे मूल्यांकन संशोधक आणि प्रत्यक्ष जग यामधील अंतर दूर करत आहे. : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती प्रविण पवार
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती प्रविण पवार यांनी आरोग्यविषयक तंत्रज्ञान मूल्यांकन यावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाला संबोधित केले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा आरोग्य संशोधन विभाग आणि इंटरनॅशनल डिसिजन सपोर्ट इनिशिएटीव (iDSI) याच्या सहयोगाने हा परिसंवाद आयोजित केला होता.
‘सार्वत्रिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने आरोग्यक्षेत्रातील तथ्याधारित निर्णय घेण्यासाठी ज्ञान व सर्वोत्कृष्ट पद्धतींचे धोरणात रुपांतरण’ ही या परिसंवादाची संकल्पना होती. या परिसंवादाला थेट किंवा दूरदृश्य पद्धतीने 500 जणांची उपस्थिती होती.
आरोग्य क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाबद्दल चर्चा करण्यासाठी या परिसंवादाने मंच उपलब्ध करून दिला. याद्वारे सार्वत्रिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने आरोग्यक्षेत्रातील तथ्याधारित निर्णय घेण्यासाठी आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनाचे संस्थात्मकीकरणाचे शाश्वत स्वरूप विकसित होईल असे भारती पवार म्हणाल्या. आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनामुळे संशोधक आणि प्रत्यक्ष जग यामधील अंतर कमी होण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आरोग्य तंत्रज्ञानाचे सामर्थ्य यावरिल एका व्हिडिओचे आणि ‘पॉलिसी ब्रिफ्स’ व ‘डेव्हलवमेंट ऑफ हेल्थ रिलेटेड क्वालिटी ऑफ लाईफ व्हॅल्यू सेट्स (EQ-5D-5L) फॉर इंडिया’ या दोन पुस्तकांचे प्रकाशनही आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते झाले. पॉलिसी ब्रीफ या पुस्तकात आतापर्यंत आरोग्य तंत्रज्ञानावरील अभ्यासावर आधारित व बोर्डाकडून मंजूर झालेले आरोग्यतंत्रज्ञान यावर आधारित धोरणांसंबधी माहिती आहे. EQ5D5L या वरील अभ्यास हा आरोग्य तंत्रज्ञान अभ्यासात समावेश असलेल्या सर्व आरोग्यविषयक परिस्थितींना अनुसरून भारतीय दर मूल्यांकन पद्धती विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकन संस्था आणि त्यांचे रिसोर्स सेंटर यांनी परस्पर सहयोगाने केलेला हा अभ्यास अशा प्रकारचा दक्षिण आशियातील पहिला व विस्तृत अभ्यास आहे.
यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेसह विविध आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांचे मान्यवर यात सहभागी झाले होते.






