Chandwad

वीजेच्या समस्यांबाबत चांदवडला प्रांत कार्यालयात मंगळवारी बैठक; शेतकरी व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आवाहन

वीजेच्या समस्यांबाबत चांदवडला प्रांत कार्यालयात मंगळवारी बैठक; शेतकरी व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आवाहन

उदय वायकोळे चांदवड

चांदवड तालुक्यातील वीजेच्या प्रश्नांसंदर्भात असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मंगळवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता येथील प्रांत कार्यालयात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून वीजेसंदर्भात अडचणी असलेल्या शेतकरी व नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले आहे.
चांदवड-देवळा मतदारसंघात वीज वितरण कंपनीकडुन सुरू असलेली सक्तीची वीज वसुली, वीज तोडणी, २४ तासाच्या आत रोहित्र (ट्रान्सफार्मर) न मिळणे, शेतकर्‍यांना दिवसाची १२ तास वीज मिळावी आदी वीजेच्या प्रश्नांसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर सुमारे ३ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात चांदवड मतदारसंघातील शेतकर्‍यांचा वीज वितरण कंपनीविरोधात मोठा रोष दिसून आल्याने जोपर्यंत विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता स्वतः येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला होता. यावेळी मुख्य अभियंता कुमठेकर यांनी आमदार डॉ. आहेर यांना ८ दिवसांच्या आत चांदवडला बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. या आश्वासनानुसार मंगळवारी चांदवड येथील प्रांत कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वीजेसंदर्भात अडचणी असलेल्या शेतकरी, नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button