Ahamdanagar

उपेक्षेच्या धनी झालेल्या – आदिवासी महिला संशोधक,उद्योजक

उपेक्षेच्या धनी झालेल्या – आदिवासी महिला संशोधक ,उद्योजक

गोपाळ कनाके

मान्हेरे, आंबेवंगण, पिंपळदरावाडी, कोंभाळणे, एकदरे, खिरविरे या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांवर त्या वस्तीला असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वामुळं त्या अलीकडे उजेडात येताय. साध्यासुध्या दिसणाऱ्या या बायांचं असामान्य कर्तृत्व कोणते? ते समजून घ्यायला हवे.

1) हिराबाई लहू गभाले:-

या ग्रामीण बँकर आहेत. मान्हेरे येथे त्या राहतात. बचत गटाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगारासाठी भांडवल देत त्यांना पायावर उभे केलेय. कितीतरी कुटुंबांचे स्थलांतर तिने रोखले आहे.

2)ममताबाई देवराम भांगरे :-

ज्यांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोगांनी देशाचे लक्ष वेधलेय त्या देवगावच्या ममताबाई देवराम भांगरे देशाच्या शेती धोरणात ममताबाई यांची केसस्टडी प्रसिद्ध झालीय, यावरुन त्यांच्या भात पिकातील संशोधनाचा अंदाज यावा! आयआयटी, आयआयएममधले प्रोफेसर, विद्यार्थी, धोरणकर्ते इथे येऊन, ममताबाईंकडून व्यवस्थापन आणि संशोधन याचे धडे घेताय! त्यांचं काम समजून घेत अभ्यास करताय.

3)सोनाबाई विठ्ठल भांगरे:-

हे पिंपळदरावाडी येथील असेच मुलखावेगळं व्यक्तिमत्त्व! यांना जलतज्ज्ञ कोण म्हणणार कारण त्यांचा रिसर्च पेपर एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश झालेला नाहीये ना म्हणून! मात्र त्यांचं काम थोर आहे. बाएफ स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले बंधारे बघायला देशोदेशीचे लोक येतातय. नैसर्गिक झऱ्यांचा, प्रवाहांचा कोंडलेला, गुदमरलेला श्वास त्यांनी मोकळा केलाय. ते पाणी उताराच्या दिशेनं घरांत आणलंय. केवढं मोठं इनोवेशन आहे हे!

4)शांताबाई खंडू धांडे:-

यांचा वेश बावळा आहे. काळ्या आईत कष्ट करताना त्या तिच्याशी एकरूप झालेल्या! यांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या आंबेवंगण येथील घराची कौलं दिसत नाहीत. का? तर त्यांच्या परसबागेतल्या वेलींनी छताचा, भिंतीचा ताबा घेतलाय. वर्षभर घरावर, परसात त्या भाजीपाला घेतात, तो पण सेंद्रीय बरं का? रोज रोज ताजी ताजी भाजी! भारीय की नाही? यांची परसबाग आणि ‘वेलींचे घर’ बघायला तर जगभरातले अभ्यासक, जिज्ञासू येतात! (यांनाही कोणी परसबागतज्ज्ञ म्हणत नाही बरं का!) नाही म्हणू देत त्याने काय फरक पडतो. चिखलात, मातीत पाय रोवून उभी असलेली, वेलींशी घट्ट जैविक नातं असलेल्या शांताबाईंना काहीही फरक पडत नाही… आपलं काम आणि आपण भले, असा त्यांचा एकूण खाक्या दिसतो!

5)हिराबाई हैबती भांगरे:-

यांचेही असेच काहीतरी भन्नाट काम आकार घेतेय बरं. एकदरे येथील त्यांच्या वस्तीजवळ भातसंशोधन केंद्र उभे राहतेय. कृषी विद्यापीठातल्या संशोधकाहून अधिक गोष्टी जाणतात या.

6)राहीबाई पोपेरे :-

रघुनाथ माशेलकर यांनी ‘सीडमदर'(बीजमाता) म्हणून ज्यांचा गौरव केलेलाय त्या राही मावशींना तर आपल्यापैकी अनेक लोक ओळखतात! अलीकडे त्या प्रकाशात आल्याय. बीबीसीने गौरवलेल्या जगभरातल्या १०० महिलांत मावशींचा समावेश आहे!त्यांची बियाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

7)पेढेकर मावशी:-

या फोटोत बिताका या अत्यंत दुर्गम गावातली पेढ़ेकर नामक महिला नाहीये. देशी गायी पाळणाऱ्या या महिलेने दूध आणि खवा विकून कुटुंबासाठी बेगमी केलेली आहे.

या सगळ्याजणी ग्रामीण, आदिवासी भागातल्या खऱ्याखुऱ्या आयडॉल आहेत!

महाराष्ट्राच्या कोपऱ्यात, सह्यगिरीच्या गिरीकंदरात अकोले तालुक्यातील या आदिवासी महिला म्हणजे उपेक्षेच्या धनी आहेत. मात्र वेगळी वाट निर्माण करणारं, त्यांचं काम दुर्लक्षितच राहिलं आहे, याची खंत आहे मनात. अर्थात त्यांना याचं काही पडलेलं नाहीये. जीवन-मरणाच्या संघर्षात हातपाय हलवताना, अभावात जगताना इनोवेशन कसे जन्माला येते, हे राज्याच्या कारभारी मंडळीनी इथे येऊन, बांधावर शेतात बसून समजून घ्यायची गरज आहे.

कृषी विद्यापीठातल्या संशोधकांचं संशोधन आम्ही नाकारत नाहीत, मात्र पिढीजात ज्ञान ज्यांच्या जीन्समध्ये, डीएनएमध्ये आहे, ज्यांनी ‘करुन दाखवलं’ आहे. त्या अंगीकृत कामाकडे धोरणकर्त्यांनी, प्रसारमाध्यमांनी, धुरीणांनी दुर्लक्ष करणे म्हणजे मोठी आत्मवंचना ठरेल. विद्यापीठातले संशोधन आणि शेतातले काम हे ज्ञानाचं राजकारण बाजूला ठेवून निकोप दृष्टीने, डोळे उघडे ठेवून ग्रामीण भागातील संशोधन, इनोवेशन समजून घेऊन धोरणांनाही दिशा द्यायची गरज आहे. अन्यथा तुमच्या शेतीविषयक धोरणांना मातीचा वास कधीही येणार नाही. त्यातून शेती आणि शेतकऱ्यांचं भलं होण्याची शक्यता धुसर वाटते. बाएफ संस्था, या स्वयंसेवी संस्थेतले सर्व जाणते आणि कार्यकर्ते अधिकारी तसेच जितीन साठे यांनी विशेषकरुन या कामाला साथ दिलीय, त्यांच्याविषयी मनातून कृतज्ञ भाव आहेत!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button