Latur

असाही अनोखा अंत्यसंस्कार… पारंपारिक विधींना छेद.

असाही अनोखा अंत्यसंस्कार…
पारंपारिक विधींना छेद… अस्थी विसर्जन शेतात तर वृक्ष लागवड करुन जलदान… सुशिक्षित कुटुंबाचा पुढाकार…

लातूर : प्रशांत नेटके
मुळचे शेळगाव ता. चाकूर पण सद्या डिगोळ ता. शिरुर अनंतपाळ येथे वास्तव्यास असलेले दिवंगत तुळशीराम लक्ष्मण कांबळे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी हृदयविकाराणे (ता.२७ डिसेंबर २०१९) रोजी निधन झाले. अंत्यसंस्कार ते जलदान विधीपर्यंतचे सर्व कार्यक्रम पारंपारीक रुढीला छेद देत वैज्ञानिक दृष्टीकोनातून साजरे करुन त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यविधी संस्कारात अनोखा नवीन पायंडा रुजविला आहे.
शेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या कांबळे कुटुंबातील सर्वच सदस्य सुशिक्षित असल्याने त्यांनी तुळशीराम कांबळे यांच्या निधनानंतर अंत्यविधी कार्यक्रमात अनेक अंधश्रद्धा बाळगणाऱ्या विधींना छेद दिला. पार्थिवाला स्नान घातल्यानंतर टीळा म्हणून एक रुपया त्याच्या माथ्यावर लावणे, विसावा टाकणे, फटाके फोडणे, वाजंत्री, मुखाग्नी देताना पाणी पाजणे, तोंडात सोने घालणे या अनिष्ट प्रकारच्या परंपराना तिलांजली दिली आहे. मृत व्यक्तीला पाणी पाजून उपयोग काय? जी सेवा जिवंतपणी करणे अपेक्षित होते ती मृत्यूनंतर करुन फायदा काय ? अशा अनिष्ट परंपरा नष्ट व्हाव्या या हेतूने हे प्रकार नाकारले आहेत.
२७ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कारावेळी आदरांजली वाहून अग्नी देण्यात आला. तद्नंतरचा रक्षा विसर्जन विधी परंपरेने आपण राख आणि हाडे गंगेत विसर्जित करतो मात्र इथे राख ही ३ जानेवारी रोजी शेतात शिंपडण्यात आली तर हाडे ही खड्डा खोदून त्यात वड पिंपळ, आंबा यासारखी वृक्ष लावण्यात आली. वड व पिंपळ हे वृक्ष शुद्ध हवा देतात तर आंबा फळे देतो म्हणून तुळशीराम बाबाच्या स्मरणात हे वृक्ष लागवड करून इतरांना फळे व शुद्ध हवा देण्याचा मानस ठेवला. कसलाही नैवद्य नाही, कावळा घास शिवण्याची वाट पाहणे नाही. केवळ अस्थि दर्शन व श्रद्धांजली अर्पण करून अंधश्रद्धा मुक्तिचा संदेश देणारा हा
अंत्यसंस्कार व जलदान विधी भन्ते धम्मसार यांच्या मंगल वाणीतून धम्मदेसना देऊन
करण्यात आला. ही संकल्पना भारतीय बोद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रंगनाथ बी. वाघमारे, प्रा रमेश कांबळे, अशोक कांबळे अर्जुन दंडे, पत्रकार सुशिल वाघमारे, इंजि. प्रीतम दंडे, राहुल कांबळे, मनोज कांबळे, विलास कांबळे व कांबळे परिवाराच्या सर्वच सदस्यांनी मान्य करून एक वैचारिक विधी घेऊन आदर्श घडविला.

फोटो क्रमांक१): डिगोळ ( शि. अनंतपाळ) येथील दि. तुळशीराम कांबळे याच्या अंत्यविधी ते जलदान कार्यक्रमात कावळा घास शिवणे ऐवजी श्रध्दांजली अर्पण करून राख सावडणे करताना नातेवाईक.

फोटो क्रमांक २): दिवंगत तुळशीराम कांबळे यांना जलदान कार्यक्रमात वृक्षारोपण करतांना भंते व नातेवाईक
दि. ३.१.२०२०

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button