अजब..धक्कादायक…नविन नाशिककरांनी सतर्क राहण्याची वेळ,…
नाशिक प्रतिनीधी शांताराम दुनबळे
नवीन नाशिक शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनासमोर आव्हान उभे असताना , दुसरीकडे नवीन नाशिकमध्येही ही संख्या मोठी असल्याने येथील नागरिकांचे धाबे दणाणले आहे . लॉकडाऊन , संचारबंदी , जमावबंदी , जिल्हाबंदी आणि नाकाबंदी असूनही नवीन नाशिक परिसरात मालेगाव , धुळे , पुणे व मुंबई अशा हॉटस्पॉट बनलेल्या शहरातून वास्तव्यास आलेल्यांमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे . लॉकडाऊनच्या काळातही आपल्याकडे करोनाबाधित आढळत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही ही बाब नवीन नाशिककरांबाबतीत तंतोतंत खरी ठरली .
अगोदर नवीन नाशिक लगतच्या गोविंदनगर पाठोपाठ अंबड – सातपूर लिंकरोड येथे करोनाबाधित आढळल्याने नवीन नाशिककरांची धडधड वाढलेली होती . त्यातच करोनाबाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांमुळे ही भीती दिवसागणिक वाढतच होती . मुळातच नवीन नाशिकचा परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे . येथील निवासी घरांची रचना चाळ स्वरूपाची असल्याने या परिसरात करोनाच्या संसर्गाची गती अधिक वेगवान असेल , यात शंका नाही . त्यातच बंदी असूनही येनकेन प्रकारे शहरात विशेषतः नवीन नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांमुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात शंकेची पाल खूप आधीपासूनच चुकचुकत होती . याच भयशंकेमुळे जागरुक नागरिक अशा नागरिकांची माहिती पोलीस , पालिका आरोग्य विभाग , तसेच स्थानिक नगरसेवक राजकीय पदाधिकाऱ्यांना देत आहेत . परिणामी दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून अशा उपऱ्या नागरिकांना वारंटाईन केले जात आहे . मात्र , त्यांना प्रवेश देणारे स्थानिक नागरिकही या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहेत , असे म्हणावे लागेल . कारण बाहेरून विशेषतः मालेगाव , मुंबई , पुण्यासारख्या क्षेत्रातून येणाऱ्या नातेवाईकांना आश्रय देण्याची मोठी चूक स्थानिकांनी केली आहे . शिवाय आलेल्यांची माहिती यंत्रणांपासून दडवून ठेवण्याचे पातकही त्यांनी केले आहे . याशिवाय आपल्याकडे अजून धोका नाही , करोना नाशिककरांच्या वाट्याला जाऊच शकत नाही , अशा मानसिकतेमुळे करोनाचा प्रवेश सुकर झाला . त्यानंतरही बहुसंख्य नागरिक किराणा , भाजीपाला , दूध रेशन , औषधे घेण्याचे निमित्त करून घराबाहेर पडत आहेत . ही मानसिकता बघता परिसरात करोनाबाधितांचा आकडा मोठा झाला तर नवल वाटायला नको .






