Mumbai

? दंगल राजकारणाची..सुप्रिया सुळेना राज्यात रस नाही; सुप्रियाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान..

? दंगल राजकारणाची..सुप्रिया सुळेना राज्यात रस नाही; सुप्रियाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान..

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे, असं सांगत सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती.
पण पवारांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असं पवारांनी सांगितलं. दैनिक ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ‘संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,’ असं शेलार यांनी सांगून सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले होते.

मात्र, शेलार यांच्या या विधानावर भाजपमधून नाराजी व्यक्त झाल्यावर त्यांनी लगेचच सारवासारव केली होती. पुण्यात एका पत्रकार परिषदेत शेलार यांनी आमचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असं सांगितलं होतं.

राजकीय विश्लेषकांच मत..

दरम्यान, पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा विषय टोलवून लावला असला तरी राजकीय विश्लेषकांनी मात्र, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतील असा दावा केला आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आजची विधानं उद्या कायम असतील असं नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही राष्ट्रीय राजकारणातच रस होता. पण हायकमांडचे आदेश मिळाल्यानंतर ते राज्यात आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यामुळे काय होईल हे आताच सांगता येणार नाही, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर, सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह चार दोन महिला राजकारण्यांची नावं कायमच मुख्यमंत्रीपदीसाठी चर्चेत असतात, त्यात काही नवीन नाही
तसेच राजकारणात उद्या काय घडेल हे आताच सांगणं शक्य नाही, असं राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button