Pune

मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही – अंकिता पाटील

मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही – अंकिता पाटील

दत्ता पारेकर पुणे

पुणे : मराठा आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा हक्कच आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण मागितलेले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी केले.
श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे शौर्यपीठावर मराठा आरक्षणावरील संवाद आणि चर्चा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंकिता पाटील, बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर आ.नितेश राणे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंकिता पाटील पुढे म्हणाल्या, मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये 58 मूक मोर्चे काढले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला एसईबीसीचे नोकरीमध्ये 12 टक्के व शैक्षणिक 13 टक्के स्वतंत्रपणे आरक्षण दिले. सदरचे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाले. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांना सध्या शिक्षण व नोकरीमध्ये असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मराठा समाजाने इतर समाजाला आरक्षणे मिळवून देताना मोठ्या भावाची भूमिका बजावली. मराठा समाजाच्या आरक्षणाला इतर समाजांनी पाठिंबा दिला आहे. नुकताच राज्य सरकारने मराठा समाजाचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या 10 टक्के आरक्षणात समावेश केला आहे. हे मराठा समाजासाठी आरक्षण नसून फक्त सवलत आहे. त्याचा फारसा फायदा मराठा समाजाला होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला कायदेशीररित्या एसईबीसीचे नोकरीत 12 व शैक्षणिक 13 टक्के टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. आता मराठा समाजाचा लढा हा आरक्षण पुन्हा जाहीर होईपर्यंत थांबणार नाही, असे भाषणात अंकिता पाटील यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संयोजक शेखर पाटील यांनी स्वागत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button