India

शहीद कमलेश कुमारीने स्वतःचा जीव देऊन वाचवले संसद भवन…! वाचा ह्या रणरागिनीच्या शहादत ची सत्यघटना..!

शहीद कमलेश कुमारीने स्वतःचा जीव देऊन वाचवले संसद भवन…! वाचा ह्या रणरागिनीच्या शहादत ची सत्यघटना..!

दिल्ली नुकताच म्हणजे १३ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत संसदेवर झालेल्या हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी गटांनी संसदेवर हा प्राणघातक हल्ला 13 डिसेंबर 2001 रोजी लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या आत्मघातकी पथकाने केला होता.सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले होते परंतु अनेक इमारतीत संसदेचे सदस्य आणि कर्मचारी त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यावेळी ५ दहशतवादी हल्लेखोर अ‍ॅम्बेसेडर कारमध्ये आले. बनावट सरकारी स्टिकरमुळे त्यांना संसद भवनाच्या आवारात प्रवेश मिळाला.पण कार संसदेच्या आवारात गेल्यावर एका कर्मचाऱ्याला कारमधील इसमांचा संशय आला. त्यामुळे दशतवाद्यांना त्यांची गाडी मागे वळवावी लागली आणि या प्रयत्नात त्यांच्या गाडीने तत्कालीन उपाध्यक्ष कृष्णकांत यांच्या वाहनाला धडक दिली.
त्यानंतर एके-४७ आणि ग्रेनेड घेतलेले सशस्त्र बंदूकधारी दहशतवादी त्यांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. हा हल्ला सुमारे ३० मिनिटे चालला आणि सुदैवाने पाचही दहशतवादी इमारतीच्या बाहेरच मारले गेले.
परंतु दुर्दैवाने या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे ५ सुरक्षा कर्मचारी, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसद वॉच आणि वॉर्ड विभागातील दोन सुरक्षा सहाय्यक ह्या सर्वांचा संसद भवनाची दशतवाद्यांपासून सुरक्षा करण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला.
या हल्ल्यात संसद भवनात कामाला असलेले एक माळी आणि एका फोटोजर्नलिस्ट ह्यांना देखील आपला जीव गमवावा लागला.यावेळी शहीद सीआरपीएफच्या महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यादव या १३ डिसेंबर २००१ रोजी संसद भवनात सुरक्षेसाठी तैनात होत्या.
त्यावेळी त्या लोखंडी गेट क्रमांक १ वर तैनात होत्या. त्यांचे काम पाहुण्यांना तपासण्यात वॉर्ड कर्मचाऱ्यांना मदत करणे हे होते. याच गेटमधून केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर व्हीव्हीआयपी आवारात प्रवेश करत असत. त्यादिवशी संसदेचे अधिवेशन तहकूब होऊन ४० मिनिटे उलटून गेली होती, परंतु सुरक्षा अधिकारी मात्र नेहमीप्रमाणेच दक्ष होते.
तेव्हा लाल बत्ती आणि संसद आणि गृह मंत्रालय असे टॅग असलेली एक पांढरी अम्बॅसिडर गाडी गेटमधून आत शिरली. नेहेमी या खुणा असलेली गाडी बघून गार्ड्स समजून जातात की ही कार व्हीव्हीआयपींपैकी एकाची आहे आणि त्यात संशयास्पद असे काहीही नाही.
पण त्यादिवशी ती गाडी बघून कमलेश कुमारींना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. ती गाडी फाटकातून जात असताना नेहेमीप्रमाणे तिचा वेग अगदी कमी होण्याऐवजी गाडी वेगाने पुढे जाऊ लागली. पण त्यावेळी कमलेश कुमारी यांच्याकडे वॉकी-टॉकीशिवाय दुसरे काहीही नव्हते. त्यांच्याकडे एकही शस्त्र नव्हते.
खरे तर सीआरपीएफ हे लेडीज बटालियन असलेले देशातील पहिले निमलष्करी दल आहे. असे असूनही संसद भवनात तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलकडे त्यावेळी एकही शस्त्र नव्हते.
पण स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा न करता, स्वत:च्या सुरक्षेला प्राधान्य न देता, कमलेश कुमारी त्या गाडीचा पाठलाग करू लागल्या, त्यांनी त्या गाडीत बसलेल्या पाच इसमांना बघितले. ते लोक शस्त्रास्त्रांसह कारमधून बाहेर पडले आणि संसदेच्या इमारतीच्या दिशेने निघाले.
ते पाच लोक दहशतवादी आहेत हे लगेच लक्षात आल्यावर कमलेश कुमारी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे इतरांना सावध करणे. त्यांनी इतर CRPF अधिकाऱ्यांशी वॉकी-टॉकीवर बोलून तसेच ओरडून त्यांना सावध केले.
या शूर वीरांगनेने स्वतःकडे कुठलेही शस्त्र नसताना अतिरेकी हल्ल्याला तोंड देण्यासाठी पहिले पाऊल उचलले. कमलेश कुमारी गेट क्रमांक ११ वर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल सुखविंदर सिंग यांच्याकडे धावल्या.
त्यांनी सीआरपीएफच्या एजन्टना सावध केले, परंतु दुर्दैवाने हे करत असताना दहशतवादी देखील सावध झाले आणि त्यांनी निःशस्त्र असलेल्या कमलेश कुमारींवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी किंवा हल्ला परतवून लावण्यासाठी कमलेश कुमारींकडे काहीही साधन नव्हते.
थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ११ गोळ्या स्वतःवर झेलत कमलेश कुमारी ह्यांनी संसदेवर हा भयंकर हल्ला होण्यापासून रोखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. परंतु या भयावह हल्ल्यात त्यांनी त्यांचे प्राण गमावले व देशाने एक शूर सुपुत्री, एक वीरांगना गमावली. पण त्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही.
या हल्ल्यामुळे सावध झालेल्या आणि दहशतवाद्यांचा पाठलाग करणाऱ्या सिंग यांनी आत्मघाती वेस्ट घातलेल्या एका दहशतवाद्याला गोळ्या घालून त्याला कंठस्नान घातले.तसेच या गोंधळात इतर सीआरपीएफ अधिकारी देखील सतर्क झाले, त्यापैकी एक संतोष कुमार यांनी पाचपैकी तीन दहशतवाद्यांना ठार करून मोठा पराक्रम गाजवला.
कमलेश कुमारी ह्यांच्या सतर्कतेमुळे त्यादिवशी संसदेवर होणारा मोठा हल्ला टळला. त्यांच्या हौतात्म्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले. त्यांनी जर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अधिकाऱ्यांना सावध केले नसते तर काय अनर्थ ओढवला असता ह्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.त्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून तत्कालीन गृहमंत्री, विदेश मंत्री आणि इतर अनेक मंत्र्यांचे व संसदेतील कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले.
कमलेश कुमारी यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या ह्या शौर्यासाठी मरणोत्तर त्यांना २००२ साली तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते अशोक चक्र या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मरणोत्तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या.कमलेश कुमारी यांच्या पश्चात त्यांचे पती अवधेश यादव आणि ज्योती आणि श्वेता या दोन मुली आहेत. वीरांगना कमलेश कुमारी यांनी देशातील हजारो मुलींना निमलष्करी दलात सामील होऊन देशाची सेवा करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.हुतात्मा कमलेश कुमारी यादव ह्यांच्या शौर्यास आणि त्यागास विनम्र अभिवादन!शहीद कमलेश कुमारीने स्वतःचा जीव देऊन वाचवले संसद भवन...! वाचा ह्या रणरागिनीच्या शहादत ची सत्यघटना..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button