Pune

ब्रिज कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळते.. नितीन मेमाणे

ब्रिज कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळते.. नितीन मेमाणे

केंद्र आरक्षण च्या शिक्षण परिषदेत प्रतिपादन
गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : केंद्र अरण ची गुगल मीट अॅपद्वारे ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न झाली. शिक्षण परिषदेत नितीन मेमाणे निर्मिती सदस्य सेतू अभ्यास वर्ग SCERT पुणे, राज्य सुलभक, मूलभूत वाचन विकास कार्यक्रम प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम सुसंवादक म्हणून प्रतिपादन केले.या शिक्षण परिषदेसाठी संभाजी रोडे ज्ञानप्रकाश फाउंडेशन पुणे, मारुती फडके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी, अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे ,अरण केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
डॉ. विलास काळे यांनी प्रास्ताविकाने शिक्षण परिषदेची सुरुवात झाली. शिक्षण परिषदेची आवश्यकता व विषय यावर माहिती सांगितली. नितीन मेमाणे यांनी पुढे प्रतिपादन केले की विठू माऊली च्या दर्शनाला ज्याप्रमाणे प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो, त्याच प्रमाणे आपला विठू माऊली म्हणजे आपला विद्यार्थी‌. त्यांची भेट घेण्यासाठी आपण शिक्षक आसुसलेले आहोत.
सेतू कोर्स ची आवश्यकता का भासली हे सांगताना मेमाणे म्हणाले की, जास्त दिवसांपर्यंत शाळा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांची अपेक्षित प्रगती नसणे, अध्ययन निष्पत्ती पर्यंत विद्यार्थी न पोहोचणे, म्हणजेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे. तसेच विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी या काळात उपलब्ध झाली नाही. विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी झालेली आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांना आनंददायी, कृती युक्त पद्धतीने शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे, मागील इयत्तेच्या अभ्यासावर आधारित अध्ययन पूर्वतयारी करणे हा उद्देश समोर ठेवून सेतू कोर्स तयार करण्यात आला. यामध्ये १) मौखिक भाषा, २) ध्वनीची जाण, ३)लिपीची जोड, ४) वाचन, ५)लेखन या अध्ययन क्षेत्रावर आधारित ४५ दिवसांचा सलग कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. क्षेत्र, संकल्पना, जाणून घेऊया, सक्षम बनूया, सराव करूया, कल्पक होऊया या सदरांचा समावेश केलेला आहे. तसेच मौखिक भाषा विकास, ध्वनिंची जाण, लिपीची जाण -परिचय, वाचन, लेखन, भाषाभ्यास -कार्यात्मक व्याकरण यावर ही सखोल मार्गदर्शन केले.
संभाजी रोडे ज्ञानप्रकाश फाउंडेशन पुणे यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा, शालेय व्यवस्थापन समिती बैठका, मनरेगा अंतर्गत करावयाची कामे, तसेच मुलांच्या शिकण्यातील पालकांचा सहभाग या विविध विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच त्यांचा सुरू असलेला चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर चे शिक्षण विषयांची नवनवीन उपक्रम, शिक्षक व विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहोचवणे. प्रेरणा देणे, शिक्षण प्रक्रिया सुलभ करणे, हे शिक्षण परिषदेचे काम असल्याचे सांगितले. केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्गदर्शना अंतर्गत शाळांचे सौंदर्यीकरण करणे, स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अंतर्गत शाळांची रंगरंगोटी, साफसफाई, वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन, किचन शेड, खेळाचे मैदान सपाटीकरण, स्वच्छता गृह यांची सफाई, संगणक दुरुस्ती, प्रयोगशाळा, वाचनालये यांची कामे करून घ्यावी, शिक्षकांनी आठवड्यातून एकदा ऑनलाईन प्रयोग करून दाखवावेत. शाळेमध्ये कुंड्या भेट देऊन त्यामध्ये फुल झाडे लावावीत १००% विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे, शालेय पोषण आहार लाभार्थी खाती उघडावीत, ऑनलाइन – ऑफलाइन शिक्षण रजिस्टर नोंदी ठेवाव्यात. याबाबत मार्गदर्शन केले.
जगतापवस्ती शाळेतील शिक्षक संतोष भोरे यांनी सेतू अभ्यासक्रम कसा आहे. याविषयी मार्गदर्शन करताना हा अभ्यासक्रम १ जुलै ते १४ ऑगस्ट २०२१ अखेर राबवायचा आहे. यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसानंतर एक याप्रमाणे तीन चाचण्यांचे नियोजन केलेले आहे. तिन्ही चाचण्या सोडवणे बंधनकारक आहे. ऑनलाइन -ऑफलाइन चाचणी घेऊन त्यांची गुण नोंद तक्त्यात गुण नोंदवावे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या- त्या इयत्तांचा अभ्यासक्रम सुरु करावा. याविषयी मार्गदर्शन केले. व्होळे शाळेचे शिक्षक आप्पा जाधव यांनी सेतु अभ्यासक्रमातील कौशल्य, संकल्पना, अध्ययन निष्पत्ती, क्षमता विधाने याविषयी सादरीकरण केले.
डॉ. विलास काळे यांनी प्रशासकीय सूचना देऊन सर्व कामांचा आढावा घेतला. दत्तात्रेय काळेल यांनी सर्वांचे आभार मानून शिक्षण परिषद संपन्न झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button