समुद्र, सह्याद्री व शिवराय यांच्या अथांगतेचा परिचय देणारे शिवसह्याद्री महानाट्याचा पहिला भाग संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
समुद्र, सह्याद्री व छत्रपती शिवाजी महाराज यांची अथांगता ही कधीच कुणाला मोजता आलेली नाही.छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी आपण आपले सबंध आयुष्य जरी खर्ची झाले तरी त्यातला काहीच अंश आपण समजून घेऊ शकतो.चाळीसगाव मध्ये सिताराम पैलवान यांच्या मळ्यात मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजीत स्वाभिमान महोत्सवांतर्गत शिवसह्याद्री या महानाट्याचा पहिला भाग पार पडला.
प्रचंड भव्य रंगमंच, दिलखेचक अशी रोषणाई, कानाच्या ठिकर्या पडतील असा आवाज, त्यासोबतच घोडे, बैलगाडी यांचा मुक्त वावर, तलवारींचा खणखणाट यांचा अनुभव शिवसह्याद्री च्या माध्यमातून चाळीसगाव करांना अनुभवायला मिळाला. स्वाभिमान महोत्सवांतर्गत शिवसह्याद्री या महानाट्याची दोन भाग करण्यात आलेली आहेत.यातील पहिला भाग छत्रपती शिवाजी महाराज जन्म ते राज्याभिषेक पर्यंत काल संपन्न झाला.त्याचा दुसरा भाग छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ते बलिदान हा दि.18/08/2019 रोजी संपन्न होणार आहे.
शिवसह्याद्री या महानाट्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदीशक्ती आई तुळजाभवानीच्या आरतीने झाली. तुळजाभवानी आईची आरती मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी केली. यावेळी या महानाट्याचे लेखक दिग्दर्शक व निर्माते अॅडवोकेट विनय दाभाडे यांचा व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे यांचा सत्कार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाला.श्रमीक गोजमगुंडे यांनी आपल्या मनोगत पर भाषणात, “छत्रपती शिवाजी महाराजांची” अथांगता समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या किल्ल्यावर जा, गडकोटांच्या बुरुजावर उभे राहा,ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील त्या ठिकाणी जा त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज समजणार नाहीत. गड किल्ल्याची स्वच्छता व त्याचे पावित्र्य राखण्याचे काम ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.असे मनोगत व्यक्त केले. या नाटकाच्या आयोजना मागची भूमिका मांडताना मंगेश दादा चव्हाण म्हणाले की, ” शिवछत्रपतींच्या कार्याचा आदर्श घेत असताना आपल्याच मातीतून निर्माण झालेली शिवछत्रपती आपल्याला समजावून घेण्यासाठी या महानाट्याचे आयोजन केले आहे. त्यांच्या विचारांवर एक दशांश जरी आपल्याला चालता आले तरी आपल्या आयुष्याचे सोने होईल. आपण सर्व स्वाभिमान महोत्सवाला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात येत आहात त्याबद्दल आभार मानतो. असे मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा आगोदरच्या परकीय राजवटीने त्रासलेली जनता, राजे शहाजी व जिजाऊंचा स्वराज्य स्थापनेचा संकल्प, शिवाजी महाराजांचे बालपण, कोंढाण्याची मोहिम, अफजलखान वध, शाहिस्तेखानावर हल्ला , आग्रा भेट, पन्हाळ्याचा वेढा व बाजी प्रभू देशपांडे यांची घोडखींडी तील लढाई , तानाजी मालूसरेंचा प्रसंग, नेत्रदिपक शिवराज्याभिषेक असा भव्य जीवनपट या महानाट्याच्या माध्यमातून दाखवण्यात आला. प्रत्येक संवाद अत्यंत उत्साहवर्धक व विचारप्रवाही होते. काही संवादांना प्रेक्षकांकडून प्रचंड टाळ्यांची व घोषणांनी दाद मिळत होती. साक्षात शिवशाही अवतरली व त्या शिवशाही मध्ये प्रेक्षक स्वतः असल्यासारखे रममान झाले होते. महानाट्यातून होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर प्रेक्षकांची प्रतिक्रिया बोलकी होती. या महानाट्याचे आयोजन बघीतल्या वर चाळीसगावकर भारावून गेले. या महानाट्याची खासियत म्हणजे आपल्या चाळीसगाव तालूक्यातील कलाकारांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग करून घेण्यात आलेला होता या महानाट्याची खूप मोठ्या प्रमाणात वाहवा व प्रशंसा होत आहे…
या महानाट्याला चाळीसगांवकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला, तब्ब्ल विस हजार प्रेक्षक उपस्थित होते. इतकी गर्दी असूनही पोलीस प्रशासन व खाजगी सुरक्षा रक्षकांनी अत्यंत चोखपणे सर्व व्यवस्था सांभाळली, तसेच १० ठिकाणी LED स्क्रीन लावल्यामुळे डोम च्या प्रत्येक कोपऱ्यातून महानाट्य पाहता येत होते.







