Maharashtra

महाराष्ट्राच्या कोविड योद्धा

महाराष्ट्राच्या कोविड योद्धा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर- आज जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. आज मितीला पाहता पगारी डॉक्टर काम सोडून जात आहेत ते केवळ जिवाच्या भीतीने आणि अशा जीवघेणी स्थितीच्या वेळी काही डॉक्टर निरपेक्ष सेवा देखील बजावत आहेत. हा मोठा विरोधाभास असला तरी एक कटू सत्य आहे. ‘माणसातील माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे’ हे या सेवेकरी डॉक्टरांच्या निरपेक्ष कार्यावरून दिसते. कोरोनामुळे वरचेवर स्थिती गंभीर होत असतानाच हे सेवेकरी सैनिकांसारखे आपल्या जागा लढवून समाजापुढे एक सर्वोत्तम आदर्श घालून देत आहेत. या कालावधीत मात्र पंढरपूरच्या तीन महिला डॉक्टरांचे कार्य मात्र विशेष लक्षवेधी ठरत आहे. तिन्ही महिला डॉक्टरांची पंढरपूर नागरिकांसाठी होत असलेली धावपळ पाहून ह्याच खऱ्या अर्थाने त्या ‘कोरोना योद्धा’ असल्याचे स्पष्ट होते. यात लढाई देणाऱ्या डॉक्टरांना पाहून सर्वसामान्य जनता अभिमानाने प्रभावित आणि पुलकीत होत आहेत. जनतेला आज या डॉक्टरांच्या रूपात देव पाहायला मिळतो. सामान्य जनता सेवेकरी डॉक्टरांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत.
कठीण समय येता कोण कामास येतो ? हे आज सामान्य माणसाला कळत आहे. व्यवसायिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन डॉक्टर हा मधला एक वर्ग आपला जीव धोक्यात घालून केवळ सेवाभावाने काम करीत आहे. मानवजात टिकवण्याची मुख्य जबाबदारी आज डॉक्टरांवर आहे. यातही निस्वार्थी भावाने काम करणारे लोक म्हणजे दैवी अवतारच म्हटले पाहिजेत. वरील हे सर्व लिहिण्यामागे कारण आज आशा परिस्थितीत पंढरपूरमधील डॉ.राजश्री सालविठ्ठल, डॉ. वृषाली पाटील, डॉ.पल्लवी पाटील हे कोविड-१९ साठी गेल्या ४ महिन्यांपासून कसलीही सुट्टी न घेता अविरत काम करीत आहेत. डॉ सालविठ्ठल या पंढरपूर न. पा.येथे १० वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. आज सद्यस्थीतीला या तीन महिला डॉक्टरांनी पंढरपूरमध्ये अडकलेल्या परराज्यातील लोकांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना स्वगृही पाठविण्याची मोलाची भूमिका देखील केली आहे. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये संस्थात्मक विलगीकरण आणि गृह विलगिकरणत असणाऱ्या लोकांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात आहे. काही त्रास होत असल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार केले जात आहेत. यामध्ये बालके, गरोदर,स्त्रिया, वृद्ध यांची विशेष काळजी घेतली जात आहे. विलागीकरण कक्षातील लोकांचे समुपदेशन करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या ३ महिला डॉक्टर करत आहेत. त्याचबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, न.पा. सफाई कामगार, चेक पोस्ट , पोलीस स्टेशन यांचे प्रत्येक आठवड्यातून एकदा थर्मल आणि एस पी ओ २ ची तपासणी डॉ. वृषाली पाटील करत आहेत. न.पा.पंढरपूरकडून सुरू करण्यात आलेल्या कंम्यूनिटी क्लिनिकमध्ये ताप सर्दी खोकला असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम डॉ. सालविठ्ठल आणि डॉ. पल्लवी पाटील यांच्या मार्फत सुरू आहे. अभिमानाची गोष्ट अशी की एमआयटी वाखरी पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये कोविड १९ पॉझिटिव्ह पेशंट तसेच हाय रिस्क कॉन्टॅक्टड पेशंट यांच्यावर अॅलोपॅथीक, आयुर्वेदीक, होमिओपॅथिक पद्धतीने उपचार सुरू आहेत. आशा या कोविड केअर सेंटर येथे डॉ वृषाली पाटील आणि डॉ पल्लवी पाटील या स्वयंपूर्तीने विनामोबदला काम करीत आहेत . त्यांचे योगदान पाहून सर्व स्तरावर कौतुक होत आहे. महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी केलेले महान कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. काम नव्हे तर कर्तव्य जाणिवेतून महिलांकडून होत असलेले कार्य कोणत्याही व्रतापेक्षा कमी नाही. हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही म्हणून असे काम करणाऱ्या महिलांना, कोविड योद्धा आणि पंढरपूरच्या लेकींना मानाचा मुजरा.
छायाचित्र- कोविड योद्धा व पंढरपूरच्या लेकीं डावीकडून अनुक्रमे डॉ. वृषाली पाटील, डॉ. राजश्री सालविठ्ठल, डॉ. पल्लवी पाटील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button