Mumbai

Mumbai Diary:Dasaraa Melawa:  शिवतीर्थ ठाकरेंचेच..! उच्च न्यायालयाने दिला ठाकरेंच्या बाजूने निकाल..!

Mumbai Diary:Dasaraa Melawa: शिवतीर्थ ठाकरेंचेच..! उच्च न्यायालयाने दिला ठाकरेंच्या बाजूने निकाल..!

ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क चं मैदान कुणाला या प्रश्नावरुन हायकोर्टात मोठं घमासान झालं. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना हायकोर्टात रंगला. कोर्टाने आजच्या अन्य सुनावणी बाजूला ठेवत, दसरा मेळाव्याबाबत सविस्तर सुनावणी घेतली. त्यानंतर तिन्ही बाजूचे दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या पारड्यात टाकला. सर्वात आधी हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हायकोर्टाने महापालिकेलाही झापलं. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचं स्पष्ट होतंय, असं हायकोर्ट म्हणालं.

तसंच कायदा सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास याचिकाकर्ते जबाबदार राहतील, असं नमूद करत सर्व नियम आणि अटीशर्तींचं पालन करणं बंधनकारक असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं.

निकाल देताना हायकोर्ट नेमकं काय म्हणाले?

आमचा निकाल देण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करतो, खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो विषय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयगोकडे प्रलंबित आहे. या निकालाचा त्यांच्या सुनावणीवर किंवा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. राज्य सरकारनं शिवाजी पार्कचा वापर 45 दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवला आहे. पालिकेच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी आपला अहवाल दिलेला आहे. दादर पोलीस स्टेशननं पोलीस संख्याबळ पाहता आपल्या अहवालात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोन्ही अर्ज फेटाळून लावण्याचं मत दिलेलं आहे. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होतंय – हायकोर्ट

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजीपार्कवर दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घेणार यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टात गेला.

हायकोर्टात आज दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गटाच्यावतीने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका आमदार सदा सरवणकर यांनी केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा मोठा दणका बसला. तसंच पालिकेने कायद्यानुसार निर्णय घेतलेला नाही असं सांगत कोर्टाने पालिकेलाही फटकारलं आहे.

ठाकरे गटाचा युक्तीवाद
ठाकरे गटाच्यावतीने आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा होऊ शकलेला नाही. आता शिवसेनेचे पदाधिकारी या नात्याने अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. शिवसेनेच्यावतीने पहिला अर्ज करण्यत आला होता. पण कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत पालिकेने परवानगी नाकारली. 2016 मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिली आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आला.

मुंबई पालिकेचा युक्तीवाद
मुंबई महापालिकेच्या वतीने वकिल मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान असून ते शांतता क्षेत्रात मोडतं असं राज्य सरकारचा आदेश आहे. तसंच दसरा मेळावा झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा मुंबई पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे कोणचाही बाजू न घेता कायदेशीर पद्धतीने कोणालाच परवानगी दिली नव्हती असा युक्तीवाद साठे यांनी केला.

पालिकेने घेतला होता हा आक्षेप
दसरा मेळाव्याच्या ठिकाणी सुरक्षा दिली जाऊ शकते, मात्र सभास्थळी पोहचण्यापर्यंत रस्त्यात दोन्ही गट एकमेकांसमोर येऊ शकतात. एकाच गटातून दोन्ही गट निर्माण झाले आहेत. प्रत्येक विभागात दोन गट आहेत आणि त्यामुळेच मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचताना वाद विवाद होऊ शकतो. याचा प्रत्यय गणपती विसर्जन मिरवणुकीत दादरला आला आहे, असा आक्षेप पालिकेने घेतला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button