मुंबई पालिका शाळांमध्ये असणार ई ग्रंथालय ,25 शाळांमध्ये प्रकल्प
प्रशांत नेटके मुंबई
Mumbai : मुंबई महानगर पालिकेच्या 25 शाळांमध्ये ई ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तब्बल तीन हजारच्या आसपास शालेय तसेच शिक्षणाशी संबंधित पुस्तके संगणकावर फक्त वाचताच येणार नसून ध्वनी आणि चलचित्रांच्या माध्यमातून ऐकता आणि पाहाता येणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे ग्रंथालय असेल.
महानगर पालिकेने तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या शाळांमध्ये ई ग्रंथालय सुरु करण्याची घोषणा केली होती. मात्र आता ही घोषणा प्रत्यक्षात उतरली आहे. 25 शाळांमध्ये अशा प्रकारचे ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 44 लाख रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव या महिन्याच्या महासभेत मांडण्यात आला आहे.
पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय असेल. त्यात पाठ्यक्रमातील पुस्तके तर असतीलच त्याच बरोबर शिक्षणाशी संबंधित अवांतर पुस्तकांचाही समावेश आहे. या पुस्तकांचा थेट पाठ्यक्रमातील पुस्तकांशी थेट संबंध नसला तरी या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना विषय अधिक समजू शकेल. अशा रितीने पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. साधारण तीन हजार पुस्तकांचा समावेश यात असेल असे शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
काय असेल ?
मराठी आणि इंग्रजी भाषेत पिडीएफ स्वरुपात पुस्तकं असतील.
ध्वनी,चलचित्र तसेच ग्राफीकल मांडणीही असेल.
लवकरच डिजीटल क्लासरुमही
मुंबईच्या पालिका शाळांमधून काळा फळा हद्द पार होऊन त्या जागी डिजीटल फळा येणार आहे. त्यासाठी महानगर पालिका निवीदा प्रक्रिया राबवत आहे. यात संगणकाच्या माध्यमातून फळ्यावर सादरीकरण करुन विद्यार्थ्यांना शिकवता येणार आहे.






