नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासाठी उभारी
सुनील घुमरे नाशिक
आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणुन महसुल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासाठी ‘उभारी’ हा कार्यक्रम राज्यासह दिंडोरी तालुक्यात राबविला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोऱ्हाटे येथील बापु दिंगबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी शासनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट देऊन कुटूंबाच्या अडचणी समजुन घेऊन त्या तात्काळ सोडुन त्यांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न केला.
महसुल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला उभारी देण्यासाठी 02 ते 09 आक्टोंबर या कालावधीत शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाची भेट घ्यावी, त्यांची सद्यपरिस्थिती समजुन घेत त्या कुटूंबाला शासनाच्या कोणकोणत्या योजनाचा लाभ देता येईल, हे निश्चित करुन त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी ‘उभारी’ हा कालबध्द कार्यक्रम सुरु केलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंडोरी उपविभागीय अधिकारी श्री. संदिप आहेर यांनी सुक्ष्मनियोजन केले असुन, त्याअंतर्गत त्यांनी तालुक्यात उपविभागीय समिती गठीत केलेली आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्याचे तहसिलदार, सहाय्यक निबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व नायब तहसिलदार यांची समितीत नियुक्ती केलेली आहे.
कोऱ्हाटे येथील आत्महत्याग्रस्त कुटूंबास उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांचे मार्गदर्शनाखाली आज दिंडोरी तालुक्याचे तहसिलदार श्री. पंकज पवार, सहाय्यक निबंधक श्री. चंद्रकांत विघ्ने, गटविकास अधिकारी श्री. चंद्रकांत भावसार, आदीनी भेट देऊन त्यांची आर्थिक स्थिती तसेच शासन दरबारी प्रलंबित कामे / अडचणी समजुन घेतल्या. अशा प्रकारे तालुक्यात झालेल्या 31 आत्महत्याग्रस्त कुटूंबांना भेटण्यासाठी तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथके निर्माण केली असुन, ते 02 ते 09 आक्टोंबर या कालावधीत सर्व आत्महत्याग्रस्त कुटूंबांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांना ‘उभारी’ देणार असल्याने तहसिलदार श्री. पंकज पवार यांनी सांगितले.






