India

चाळीशी का लागते ?

चाळीशी का लागते ?

प्रतिनिधी प्रविण काटे

आपण नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी उठून वर्तमानपत्र वाचत असतो आणि आपल्याला अकस्मात जाणवतं की आपण ते वर्तमानपत्र नेहमीपेक्षा जरा दूरवर धरतो आहोत. कोपरातून हात वाकवत ते धरण्याऐवजी वाकवलेला कोपरा जरा ताणतो आहोत. नेहमीच्याच अंतरावर जर तो कागद धरला तर त्यावरची अक्षरं धुसर दिसताहेत. स्पष्टपणे वाचता येत नाहीत. कधी कधी हेही जाणवतं की तसंच बराच वेळ वाचत राहिलं तर डोळे थकल्यासारखे होतात. दुखतात. टीव्ही पाहायला बसलं तर त्यावरची काही अक्षरं नीट वाचा येत नाहीएत. पूर्वी तीच स्पष्ट दिसायची.
आपण डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो. ते सांगतात आता चष्मा लावायला हवा. जवळचा आणि दूरचाही. बायोफोकल घ्या. आपण कारण विचारतो. ते मिश्किलपणे हसत सांगतात. चाळीशी आली की तुमची. चाळीशी लागणारच. असं वय झालं की ही चाळीशी का लागते हा प्रश्न मात्र मनात अतिशय स्पष्टपणे उमटत राहतो.

कोणत्याही वस्तूवरून परावर्तित झालेला प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यात शिरतो तेव्हा ते प्रकाश किरण आपल्या डोळ्यातल्या भिंगातून डोळ्यांच्या पडद्यावर केंद्रित केले जातात. त्यामुळे त्या वस्तूंची स्पष्ट प्रतिमा तिथं उमटते. पण समोरची वस्तू निरनिराळ्या अंतरावर असू शकते, तरीही तिची प्रतिमा नेमकी डोळ्यांच्या पडद्यावर आणि स्पष्टपणे उमटते. हेच काम जर काचेच्या भिंगावर सोपवलं तर आपल्याला निरनिराळ्या भिंगांची जरुरी भासेल. कारण प्रत्येक भिंगांची केंद्रीय लांबी वेगवेगळी असते. आपल्या डोळ्यांतलं एकमेव भिंगच जवळच्या आणि लांबच्या सर्वच अंतरावरच्या वस्तूंची स्पष्ट प्रतिमा उमटवतं.
ही किमया त्या भिंगाला साध्य होते, कारण हे भिंग लवचिक असतं. ते पाहिजे तितकं फुगीर बनू शकतं किंवा सडपातळही होतं. त्यामुळे गरजेप्रमाणे त्याची केंद्रीय लांबी बदलू शकते. या लवचिकतेला त्या भिंगाशी जोडलेल्या स्नायूंची साथ मिळते. ते स्नायू त्या भिंगाचा गरजेनुसार हवं तेवढं वाकवतात व त्याचा केंद्रीय बिंदू बदलतात; पण वयोपरत्वे भिंगांची लवचिकता कमी होते. ते थोडा फार ताठर बनतं. हवं तसं वाकु शकत नाही. त्याच्याशी निगडित स्नायूही थकलेले असतात. तेही त्या भिंगाला एका मर्यादेपलीकडे वाकवू शकत नाहीत. त्यामुळे मग सर्वच वस्तूंवरून आलेले प्रकाशकिरण एकाच ठिकाणी केंद्रीभूत होऊ शकत नाहीत. काही डोळ्यांच्या पडद्यापलीकडे एकत्र येतात, तर काही अलीकडे. त्यामुळे मग प्रतिमा निरनिराळ्या ठिकाणी उमटतात. पडद्यावर नाही. त्या किरणांना हवं तसं वाकवून ते डोळ्यातल्या पडद्यावरच एकत्र येतील आणि तिथंच स्पष्ट प्रतिमा उमटवतील. हे साध्य करण्यासाठी त्याला परकीय मदतीची गरज भासते. चष्म्याची भिंग हीच मदत पुरवतात.

डोळ्यांतील भिंगांची लवचिकता तशी हळूहळू कमी होतच असते; पण वयाच्या चाळीशीच्या सुमारास ती जाणवण्याइतकी कमी होते. स्नायूंचा थकवाही त्याच सुमाराला जाणवायला लागतो आणि नाकावर चाळीशी चढते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button