लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी भरपूर वाचन करावे – डॉ राजेंद्र राजपूत
प्रतिनिधी सलीम पिंजारी
ज्ञानाचे प्रतीक, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी स्वतंत्रपणे राजगृहाची निर्मिती करून सर्व समाजाला भरपूर वाचन करण्याचा मार्ग दाखविला. आपणही विद्यार्थीदशेत लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी भरपूर वाचावे. यात विविध विषयातील आणि विविध भाषेतील पुस्तकांचा अभ्यास करावा. परीक्षेपुरता नव्हे तर आयुष्याला समृद्ध करण्यासाठी वाचन करावे. लेखन कौशल्य समृद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक मेहनत घेतल्यास विद्यार्थीदशेसोबत आयुष्यातही यशस्वी व्हाल असे मत प्रा डॉ राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात लॉकडाऊन काळाचा सदुपयोग म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ डी ए कुमावत यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालया तील आय क्यू ए सी च्या माध्यमातून समन्वयक प्रा डॉ उदय जगताप यांच्या कृतिशील आय सी टी चा वापर करून अध्ययन अध्यापन करण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रा शिवाजी मगर यांनी पुढाकार घेत तृतीय वर्ष विज्ञान वर्गाच्या वनस्पती शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस ची सुरुवात केली. त्यात विविध विषयावर महाराष्ट्रातील नामांकित प्राध्यापकांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत आहेत. लेखन कौशल्य आणि वेळेचे व्यवस्थापन या विषयावर महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य विकसित करण्याच्या उपयुक्त पद्धती समजावून सांगितल्या. यासोबत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अंमलात आणल्या गेलेल्या लॉकडाउनचा सर्वंकष व्यक्तिमत्व घडविण्यासाठी यथायोग्य उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पाठिंबा दिला असून यापुढे वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील आय क्यू ए सी च्या उपक्रमाची महाविद्यालयातून आणि परिसरातून प्रसंशा होत आहे.






