Amalner

“दार उघड उद्धवा दार उघड” म्हणत देवस्थाने सुरू करण्यासाठी घंटानाद..

“दार उघड उद्धवा दार उघड” म्हणत देवस्थाने सुरू करण्यासाठी घंटानाद

माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली वाडी चौकात आंदोलन

मंदिरे उघडण्यासाठी हिंदू संघटनांनी तहसीलदारांना दिली निवेदने

रजनीकांत पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेली देवस्थाने आणि धार्मिक स्थळे बंद आहेत. तर दुसरीकडे मॉल, मांस मदिरा चालू आहे. त्यामुळे ही देवसथाने सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी शनिवारी २९ रोजी अमळनेरात वाडी चौकात भाजपातर्फे “दार उघड उद्धवा दार उघड” असे म्हणत जोरदार घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.

भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर अमळनेर येथील वाडीचौकात माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल, मांस मदिरा चालू झाले आहे. मात्र ठाकरे सरकारने गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे बंद केली आहे.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरू करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडीसरकार ती मान्य करत नाही. म्हणूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात आल्याचे माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले. या आंदोलनात अ.भा.संत समिती, वारकरी समिती, अ.भा. पुरोहीत संघ, जय बाबाजी भक्त परिवार, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक प्रमुख धार्मिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि हिंदू संघटनांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देऊन देवस्थाने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

देवस्थाने न उघडल्यास विसर्जनानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थानांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे. म्हणून ‘ठाकरे सरकार’ला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” करण्यात आले आहे. शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आहेत आणि सिल्व्हर ओक हीच त्यांची पंढरी आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास गणेश विसर्जनानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांना दिला आहे. त्या प्रसंगी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,माजी सभापती श्याम आहिरे,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील, बबलू राजपूत,राहुल पाटील,माजी शहराध्यक्ष शितल देशमुख,दिपक पाटील,महेश पाटील,दिपक पवार,तुळशीराम हटकर,योगीराज चव्हाण, पंकज भोई,कल्पेश पाटील,राहुल चौधरी,बाळा पवार,आयज बागवान,समाधान पाटील,कुंदन पाटील,मुशाईद शेख,निखिल पाटील,राहुल कंजर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button