“धनाजी नाना महाविद्यालय येथे ‘पालकत्व’ विषयावर कार्यशाळा”
फैजपूर सलीम पिंजारी
मानसशास्त्र विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर आणि सृजन क्लासेस, सवदा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘पालकत्व’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा तीन सत्रांत संपन्न झाली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘शालेय वयातील पालकांची भूमिका’ या विषयावर मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव सर यांनी पालकांना समुपदेशन केले. दुसऱ्या सत्रात ‘पाल्याची करिअर तयारी कशी करावी?’ या विषयावर जळगाव येथील समुपदेशक श्री. पंकज व्यवहारे यांनी समुदेशन केले. तर तिसऱ्या सत्रात ‘पालक-बालक संबंध : समस्या आणि उपाय’ या विषयावर प्रा. डॉ. सोपान बोराटे, मानसशास्त्र विभाग प्रमुख, प. क. कोटेचा महाविद्यालय, भुसावळ यांनी समुपदेशन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. आय. भंगाळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पालकांना आजच्या युगात मुलांचे संगोपन करताना मानसशास्त्रीय ज्ञान-कौशल्य तसेच मानसशात्रीय दृष्टिकोणाची किती गरज आणि महत्व आहे हे सांगितले. तसेच पालकत्व संदर्भात मानसशास्त्राचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. राजु पटेल यांनी केले. तसेच कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. सीमा. एस. बारी, प्रा. पूर्वी ससाणे आणि विद्यार्थी धीरज खैरे, रेश्मा तायडे, वैशाली शिरतुरे, सुवर्ण वराडे यांनी परिश्रम घेतले.






