Pune

गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे प्रतिनिधी । सुशिल कुवर :

महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी पुढे म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारनेच्या कामाला प्रचंड विरोध झाला परंतू कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.

सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.

*सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादित न राहता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देश आणि समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.

*शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा नसावा-छगन भुजबळ*

श्री.भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर जगातील विविध भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

सामाजिक कार्य करणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषांचे महत्त्व कळायला समाजाला उशीर लागतो. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे बसविला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे त्यांनी सांगितले.

*महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उदय सामंत*

श्री.सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणि ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, बालहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा ‘काव्यफुले’ हा संग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.

*सावित्रीबाई लिंग समानता चळवळीच्या आधारस्तंभ: डॉ. नीलम गोऱ्हे*

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. विधवा ‍ महिलांची बाळंतपणं त्यांनी केली होती. सावित्रीबाई फुले लिंग समानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी ‍शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श प्रस्तुत केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत करण्यासाठी विद्यापीठ परिसरात पूतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी देखील विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला उपमहापौर सुनिता वाडेकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button