Nashik

आरोग्यभान राखून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी नियोजन करावे;,

आरोग्यभान राखून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी नियोजन करावे;,

अनलॉकच्या दिशेने जात असताना पुन्हा लॉकडाउन होणार नाही :पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक , शांताराम दुनबळे

नाशिक-:जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून ते पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. तसेच रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउन होणार की काय; अशी अनाठायी भिती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, त्यामुळे अनलॉकच्या दिशेने जात असताना आता लॉकडाउनचा प्रश्नच उद्भवत नाही असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करावा, अशा सूचना आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणा संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, शहरातील रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ती वाढणार आहे त्यासाठी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती वाढुन नियंत्रणात येते, याचे मालेगाव हे यशस्वी उदाहरण आपल्याजवळ आहे. त्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणा तत्पर व नेहमी सक्षम असल्याचे वारंवार समोर आले आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा ही आपली जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावून जे काही करता येईल ते केले पाहिजे. शासनाकडून जिल्ह्याला कोरोना आपत्तीच्या नियंत्रणासाठी पुरेसा निधी कमी पडू दिला जाणार नाही. आरोग्य यंत्रणेने त्यादृष्टीने नियोजन करुन लागणारी सर्व साधन-सामग्री तात्काळ खरेदी करावी.

महापालिकेने प्रभावी सर्वेक्षण करावे व केवळ घरोघरी जाऊन मौखिक माहिती न घेता प्रत्येक सर्वेक्षण पथकाला वैद्यकीय स्वरूपाच्या प्राथमिक नोंदणी घेण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधने देण्यात यावीत. तसेच भविष्यात सर्वेक्ष अधिक गतीने व व्यापक स्वरूपात करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी रूग्णसंख्या जास्त आहे, अशा भराडवाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळा गांव याठिकाणी स्वतंत्र कॅम्प लावून सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

शासनाची स्वत:ची लॅब तत्काळ सुरू करून व रूणालयांची क्षमता वाढवावी
भविष्यातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब सुरू करण्यात यावी असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सूचित केले. श्री. भुजबळ म्हणाले की, शहरातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून जिल्हा रूग्णालय, इंडियन सिक्युरीटी प्रेस, एचएएल तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांची क्षमता तपासून त्यात क्षमतावाढीच्या दष्टीने नियोजन करावे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता असेल अशाच ठिकाणी शक्यतो स्वतंत्र कक्ष निर्माण करावेत जेणेकरून एकाच ठिकाणी वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ, उपचारासाठीचे नियोजन करणे सोपे व सुरळीत होईल. त्यानंतर खाजगी रूग्णालयांशी संपर्क साधून शासकीय कोट्यातील उपचारांचा आढावा घेवून त्यासाठी महापालिका, जिल्हा रूग्णालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक करून तेथील संभाव्य क्षमतावाढीचे नियोजन करावे, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील संसर्ग नियंत्रित करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे
नाशिक शहरासोबतच आता ग्रामीण भागांत रूग्णसंख्या वाढणार नाही यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात येवला व मनमाड येथील रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते. ती व ग्रामीण भागातील रूग्णसंख्या तात्काळ नियंत्रणात आणावी, ती नियंत्रणात राहिली तर शहरातील वाढत्या रूग्णसंख्येवर आपल्याला नियंत्रणाच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करता येईल. ग्रामीण भागातील सर्वेक्षणात अत्यंत सचोटीने रूग्णांची तपासणी व माहिती संकलित केली तरच करून पुढील उपचारांचे नियोजन करता येणार आहे असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

आता ‘अनलॉक’च कायम राहील
नाशिक शहरात वाटणारी लोकसंख्या ही अपेक्षितच आहे. परंतु त्यामुळे लोकांच्या मनात कारण नसतांना भिती निर्माण होते आहे, सुरक्षित सामाजिक अंतर राखून गरजेपुरता बाहेर निघणे, अनाठायी भिती न बाळगणे व कोरोनात आरोग्यभान राखून जिल्ह्यातील अर्थचक्र, विद्याचक्र, शेतीला गती दिली तरच लोकांना रोजगार व चरितार्थासाठी दोन पैसे मिळतील. केवळ रेशन दुकानातील धान्यावर लोक जगू शकत नाहीत, त्याव्यतिरिक्तच्या गरजा भागविण्यासाठी उद्योग, व्यवसाय सुरू ठेवावे लागतील त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाउनची असलेली भिती, अनावश्यक वाटणारी निर्बंध कमी करण्यात यावेत व कोरोनात आरोग्यभान राखून नागरिकांनीच आपले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी कायकाय करायला हवे, कोणती पथ्य पाळायला हवीत याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

बैठकीच्या अगोदर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वस्तुस्थितीबाबतची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सहभाग घेतला.

बैठकीच्या शेवटी पीक कर्ज व निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईबात चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संबोधित केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button