Amalner: दोन वर्षाचा चिमुकला… पिसाळलेले कुत्रे… तोडले लचके.. शहरात भितीचे वातावरण..
अमळनेर शहरातील देशमुख नगरमध्ये दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी एका दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला घरा समोरून उचलून नेऊन लचके तोडल्याची घटना ८ रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील देशमुख नगरमध्ये प्रांशु ओजस सूर्यवंशी (वय २वर्षे ) हा आपल्या घराच्या गेट मध्ये खेळत असताना अचानक दोन कुत्रे आले. त्यांनी प्रांशुला ओढून दुसरीकडे नेले त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. मुलगा रडायला लागताच जवळच असलेल्या संगीता पवार यांना आवाज आला. त्यांनी धावत जाऊन बाळाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. यामुळे बाळाचा जीव वाचला. त्याला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार म्हणून बाळाला इंजेक्शन देण्यात आले.
मात्र बाळाच्या अंगावर अनेक खोल जखमा झालेल्या असल्याने आणि त्याची प्रकृती गंभीर होत चालली होती. ए आर एस इंजेक्शन अमळनेर मध्ये उपलब्ध न झाल्याने त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे त्याला आवश्यक ए आर एस इंजेक्शन देण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.






