Chandwad

जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड कोरोना रुग्णांना द्यावेत-आ डॉ राहुल आहेर

जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड कोरोना रुग्णांना द्यावेत-आ डॉ राहुल आहेर

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉन कोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे.अशी मागणी डॉ राहुल आहेर यांनी केली आहे.
सध्या जिल्हाभर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहेत. त्यांच्यासाठी उपचाराच्या सर्व सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉन कोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने तीनशे खाटा उपलब्ध होतील. प्रशासनावरील ताण देखील काही प्रमाणात हलका होईल, अशी सूचना आमदार डॉ. राहूल आहेर यांनी केली आहे.

यासंदर्भात डॉ. आहेर यांनी नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विभागीय महसूल आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी संबंधीतांना लिखीत निवेदन दिले आहे. आज ते पालकमंत्र्यांना पत्र देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात डॉ. आहेर म्हणाले, सध्या शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचारी, डॉक्‍टर्स, परिचारीका व जिल्हा प्रशासन दिवसरात्र काम करीत आहे. मात्र रुग्णांच्या संख्येतील वाढ व उपलब्ध उपचाराच्या सुविधा हे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसते. विविध तज्ञांनीही त्याकडे लक्ष वेधले आहे. अशा स्थितीत अन्य पर्यायांचा विचार करण्याची वेळ आली आहे.
ते म्हणाले, प्रारंभी जिल्हा शासकीय रुग्णालयात शंभर खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध केल्या होत्या. त्यात वाढ करून त्या दोनशे व सध्या तीनशे केल्या आहेत. मात्र तरीही त्या पुरेशा नाहीत. जिल्ह्याच्या सर्व भागातून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर ताण येतो आहे. सध्या नॉन कोविड उपचाराच्या सुविधांचे काम असेही कमी झालेले आहे. बाळंतपण वगळता अन्य रुग्णसंख्या फारसी नसते. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय तज्ञ, कर्मचारी, परिचारीका आहेत. तेथे रुग्णसंख्या अतीशय कमी आहे. त्यामुळे तेथे जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉन कोविड वैद्यकीय सेवेचे काम वर्ग करता येईल. त्याने रुग्णांची कोणतिही गैरसोय होणार नाही. जिल्हा रुग्णालयातील किमान तीनशे खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होतील. त्यातून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button