Maharashtra

?️ कोरोना अपडेट…अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपेक्षितच…..

अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपेक्षितच…..

जगभरासह देशात आणि राज्यात सुमारे तीन महिन्यापासून कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशासह राज्यात हजारोंच्या संख्येने बळी गेले आहेत. राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढेल असा अंदाज बांधून शासनाने दि. २३ मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला आणि ग्रामीण, आदिवासी भागात गाव पातळीवर व नागरी विभागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कोरोनाच्या सर्व्हे करण्याच्या कामाला लावले आहे. या कामाकरिता फक्त ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देऊ केला असून विमा संरक्षण दिले आहे.

अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस अधिकारी कर्मचारी, सफाई कामगार, एम.एस.ई.बी.कर्मचारी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. किंबहुना अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका ह्या बाधित भागात आणि कंटनमेंट झोनमध्ये प्रत्यक्षात आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू नये म्हणून उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यासोबतच, कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याविषयी चौकशी करण्याचे काम दररोज नियमितपणे करीत आहेत.

अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका ह्या १००% महिला कर्मचारी आहेत. महिला असूनही आपले घर व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून कोरोनाच्या या लढाईत राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी व ७० हजार आशा स्वयंसेविका ह्या अत्यल्प मानधन घेणाऱ्या कर्मचारी कोरोनाच्या संकटसमयी लढाईत अग्रभागी आहेत. गेल्या दोन महिन्यापासून जीव धोक्यात घालून सातत्याने काम करीत आहेत. असे असतांनाही त्यांच्या सुरक्षितता व आरोग्याची साधी काळजीही घेतली जात नाही. काम करत असतांना बहुतांश ठिकाणी त्यांना सँनिटायझर, हँडग्लोज, पी.पी.ई किट व अन्य महत्त्वाचे व मुलभूत साहित्य ही पुरविण्यात आले नाहीत. सदर साहित्य पुरवावे म्हणून त्यांना रोज संघर्ष करावा लागतो आहे आणि वरिष्ठांचा रोष ओढवला जात आहे. अशा परिस्थितीत ह्या महिला कर्मचारी काम करीत आहेत हि वस्तुस्थिती आहे. परंतु प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे,व्रुतपत्र हे मात्र पोलीस प्रशासन, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्या कामाचे रोज कौतुक करत आहेत. ते कौतुकास्पद आहेतच यात तिळमात्र शंका नाही. मात्र यातून अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका हरविल्या कि काय असा प्रश्न निर्माण होतो.

शासनाकडून अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तकांवर नेहमीच अन्याय करून भेदभावाची वागणूक मिळत आहे. अशी वागणूक प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, व्रुतपत्र आदींनी ह्या महिला कर्मचाऱ्यांना देऊ नये आणि त्यांच्या कामाची सुद्धा सर्वांकडून दखल घेतली जावी आणि त्यांचे मनोबल वाढवावे. ह्या महिला कर्मचाऱ्यांच्या नियमित कामाचे तसेच संकटसमयी सहकार्य करणाऱ्या ह्या महिला कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. याची दखल घेऊन या कर्मचाऱ्यांना उपेक्षित न ठेवता त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने सोडविण्यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेचे फायदे व वेतन लागू करावे हिच याप्रसंगी अपेक्षा……..!!!!

स्वतः ची आणि कुटुंबाची काळजी घ्या अंगणवाडी व आशा स्वयंसेविकांना मानाचा मुजरा…!!!!

रामकृष्ण पाटील, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी आणि आशा वर्कर संघटना

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button