Jalgaon

जळगाव जिल्हा कारागृहाची संरक्षण भिंत उंच करण्याच्या कामास सुरुवात

जळगाव जिल्हा कारागृहाची संरक्षण भिंत उंच करण्याच्या कामास सुरुवात

रजनीकांत पाटील

जळगाव रिपोर्ट ::> जिल्हा कारागृहाची संरक्षण भिंत (तट) उंच करण्याच्या कामास शनिवारी पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. हे काम सुरू झाल्यानंतर काही दिवस पुन्हा बंद पडले होते.

जिल्हा कारागृहातून २५ जुलै रोजी सुशील मगरे, गौरव पाटील व सागर पाटील हे तीन कैदी पिस्तूलचा धाक दाखवून रक्षकास मारहाण करीत पळून गेले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली हाेती. यातील गौरव व सागर पाटील यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तर सुशील मगरे हा बेपत्ता आहे.

दरम्यान, कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे. घटनेनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या. कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली. सध्या पेट्रस गायकवाड हे अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. या घटनेनंतर सुरक्षेचे उपाय म्हणून काही बदल सुरू करण्यात आले आहे.

मागच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून कैद्यांसाठी मोबाइल, पिस्तूल, सिमकार्ड, काडतूस या वस्तू आत फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्या अनुषंगाने सर्वप्रथम कारागृहाच्या चौफेर असलेली संरक्षण भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

ही भिंत पूर्वीपेक्षा दहा फुटाने वाढवण्यात येते आहे. त्यामुळे आतमध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू फेकण्यास सोपे जाणार नाही. तसेच आत व बाहेरील बाजूस असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येणार आहे.

कारागृह अधीक्षक गायकवाड यांनी कैद्यांची झडती घेणे सुरू केले आहे. आपत्तीजनक वस्तू मिळून आल्यास कारवाया सुरू केल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांतच भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्ण होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button