रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत सात लाख गंडवले..जळगावात पिता-पुत्राविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल!
जळगावच्या महिलेची झाली फसवणूक
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
जळगाव तरुणीस रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत पिता-पुत्राने एका महिलेस सात लाख रुपयांत गंडवल्याचा प्रकार समोर आला अआहे. या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनात पिता-पुत्राच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
योगिता ऋषिकेश खैरनार (वय ४०, रा.न्यू सम्राट कॉलनी, जळगाव) यांची फसवणूक झाली आहे. तर आकाश मनोहर पाटील व त्याचे वडील मनोहर वामन पाटील (दोघे रा. वडगाव ता. रावेर) या पिता-पुत्राने त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
योगिता खैरनार यांना वर्षा व श्वेता ह्या दोन मुली आहे. दोन्ही सुशिक्षित बेरोजगार आहेत. दरम्यान श्वेता हिचा मित्र आकाश हा योगिता यांच्या घरी येत असे. आकाशाचे वडील रेल्वेत टीसी आहेत.
दरम्यान, वर्षा हिला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष आकाश याने सन २०१८ मध्ये दिले. त्याच्या बोलण्यात येऊन योगिता यांनी सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी १० हजार रुपये दिले. यानंतर आकाश व त्याच्या वडिलांनी वेळोवेळी करून योगिता यांच्याकडून ७ लाख रुपये घेतले.
मधल्या काळात आकाशाने बनावट जॉईनिंग लेटरदेखील बनवून आणले होते; परंतु वर्षा हिने जॉईन होण्याच्या आधीच ‘कुणीतरी फोन लावल्याने आता जोईनिंग करता येणार नाही. अशी थाप मारून आकाशाने वेळ मारून नेली होती.
यानंतर योगिता यांनी आकाशकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. या वेळी पैसे परत मागितल्यास जीवाचे बरे-वाईट करून घेईल, अशी धमकी आकाशने दिली. तर ‘आकाश याला मी ओळखत नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या’ असे उत्तर आकाशच्या वडिलांनी दिले होते.
अन…गुन्हा नोंदवला
आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर योगिता यांनी जवळच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. तरी देखील या पिता-पुत्राने त्यांचे पैसे परत केले नाहीत. अखेर योगिता यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार पिता -पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील तपास करीत आहेत.






